IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीच्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर त्यांनी माना टाकल्या. मार्को यान्सेनने दुसऱ्याच षटकात दोन धक्के देत KKRचे कंबरडे मोडले आणि त्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. रिंकू सिंगने ( Rinku Singh) एकट्याने खिंड लढवताना KKRला सन्मानजनक पल्ला गाठून दिला. मयांक मार्कंडेने KKRचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलची विकेट घेताच SRHच्या मालकिण काव्या मारन डान्स करताना दिसल्या.
चीते की चाल और बाज की नजर! एडन मार्करामने टीपला अविश्वसनीय झेल, KKRचा कॅप्टन OUT
KKRचे आघाडीचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले आणि यंदाच्या आयपीएलमध्ये हिच त्यांची डोकेदुखी ठरली आहे. पुनरागमन करणाऱ्या जेसन रॉयने काही सुरेख फटके मारून आशा जागवल्या होत्या. पण, अन्य फलंदाजांनी पाट्या टाकल्या. मार्को यान्सेनने दुसऱ्याच षटकात रहमानुल्लाह गुरबाज ( ०) व वेंकटेश अय्यर ( ७) यांची विकेट घेतली. आयपीएल २०२३ मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या कार्तिक त्यागीने पाचव्या षटकात SRHच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्याने २० धावांवर खेळत असलेल्या जेसनला माघारी पाठवले. रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांचा खेळ KKRला दिलासा देणारा ठरत असताना एडन मार्करामने गोलंदाजी केली.
१२व्या षटकात एडन मार्करामने त्याच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत ही जोडी तोडली. नितीश ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला. नितीश व रिंकूची ४० चेंडूंत ६१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. आंद्रे रसेल आज आत्मविश्वासाने खेळताना दिसला. त्याने दोन उत्तुंग षटकार खेचून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार पूर्ण केले आणि असा पराक्रम करणारा तो ख्रिस गेल ( १०५६) व किरॉन पोलार्ड ( ८१२) यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला. पण, मयांक मार्कंडेने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. रसेल १५ चेंडूंत २४ धावा करून माघारी परतला. त्याची विकेट मिळताच स्टेडियमवर एकच जल्लोष झाला अन् काव्या मारनही ( Kavya Maran) प्रचंड आनंदी दिसली. भुवीने पुढील षटकात सुनील नरीनची विकेट घेत KKRची अवस्था ६ बाद १३० अशी केली.
रिंकू एका बाजूने खिंड लढवताना दिसला, परंतु समोरून त्याला साथ मिळाली नाही. शार्दूल ठाकूरनही ८ धावांवर टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर अनुकूल रॉयने धावसंख्येत महत्त्वाच्या धावा जोडल्या. २०व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंग ४६ धावांवर बाद झाला. अब्दुल समदने अप्रतिम झेल घेतला. टी नटराजनने २०व्या षटकात ३ धावा दिल्या अन् कोलकाताला ९ बाद १७१ धावांवर रोखले.