IPL 2023, SRH vs MI : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादवर १४ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या SRHचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १७८ धावांत तंबूत परतला. कॅमेरून ग्रीनची अष्टपैलू कामगिरी, टीम डेव्हिडची क्षेत्ररक्षणात दाखवलेली कमाल... हे या सामन्याचे वैशिष्ट ठरले. पण, २०व्या षटकाने सर्वांचे लक्ष वेधले. जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ व ग्रीन या अनुभवी गोलंदाजांची षटकं रोहितने आधीच संपवली अन् २०वे षटक युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar) हाती सोपवलं. ड्रेसिंग रुममध्ये बसलेला सचिन तेंडुलकर टेंशनमध्ये होता, परंतु रोहितने दाखवलेला विश्वास अर्जुनने सार्थ ठरवला.
अपेक्षांवर खरा उतरला अर्जुन तेंडुलकर, रोहितने मारली मिठी; खूश झाला बाप माणूस, Video
रोहित शर्मा ( २८), इशान किशन ( ३८), कॅमेरून ग्रीन ( ६४) व तिलक वर्मा ( ३७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ५ बाद १९२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादकडून मयांक अग्रवाल ( ४८), हेनरिच क्लासेन ( ३६) व एडन मार्कराम ( २२) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. तरीही हैदराबादने हा सामना खेचून आणला होता. अखेरच्या षटकांत त्यांच्या फलंदाजांनी चांगला जोर लावला असता तर निकाल वेगळा नक्कीच लागला असता. टीम डेव्हिडने ४ झेल घेतले अन् एक अप्रतिम रन आऊट केला. अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना अर्जुन गोलंदाजीला आला अन् त्याने केवळ ५ धावा देत भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली.
सचिन तेंडुलकरने आयपीएल कारकीर्दित ६ षटकं फेकली, परंतु त्याला विकेट घेता आली नाही, परंतु अर्जुनने ४.५ षटकांत पहिली विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने रणजी करंडक ट्रॉफीत पहिली विकेट सचिनची घेतली होती आणि आज अर्जुनने आयपीएलमधील पहिली विकेट घेताना भुवीला बाद केले. अर्जुनने आज २.५-०-१८-१ अशी स्पेल टाकली आणि त्यात ९ निर्धाव चेंडू होते. या कामगिरीनंतर सचिननं खास ट्विट केलं,''मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली. कॅमेरून ग्रीनने फलंदाजी व गोलंदाजीत प्रभावी खेळ केला. इशान व तिलक यांनी फलंदाजीत चांगलं योगदान दिलं. आयपीएल दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. आणि अखेर तेंडुलकरने आयपीएलमध्ये विकेट मिळवली.''