Join us  

IPL 2023, SRH vs MI Live : मुंबई इंडियन्सची विजयाची हॅटट्रिक; अर्जुन तेंडुलकरचे अप्रतिम शेवटचे षटक, घेतली विकेट

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:19 PM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा हा सामना मुंबईने १४ धावांनी जिंकला. कॅमेरून ग्रीन ( Cameroon Green) आजच्या सामन्याचा नायक ठरला. त्याने फलंदाजीत कमाल करताना मुंबईला मोठी धावसंख्या उभारून दिली अन् गोलंदाजीत विकेट घेत कमाल केली. SRHलाही आज सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी होती, परंतु त्यांच्या फलंदाजांनी निराश केले. MIच्या टीम डेव्हिडनेही आज ४ झेल व १ रन आऊट करून विजयात मोलाचा हातभार लावला.  हैदराबादचा पराभव होताच काव्या मारन ( Kavya Maran) नाराज झालीय, शिवाय एक चिमुकला ढसाढसा रडू लागला. 

अर्जुनने गोलंदाजीची सुरुवात करताना पहिल्या षटकात केवळ ६ धावा दिल्या. दुसऱ्या षटकात जेसन बेहरनडॉर्फने MIला विकेट मिळवून दिली. हॅरी ब्रूक ९ धावांवर बाद झाला. अर्जुन चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकत होता. बेहरेनडॉर्फने त्याच्या दुसऱ्या षटकात SRHला आणखी एक धक्का देताना राहुल त्रिपाठीला ( ७) बाद केले. हैदराबादचे दोन फलंदाज २५ धावांवर माघारी परतले. कर्णधार एडन मार्कराम व मयांक अग्रवाल यांनी ४६ धावांची भागीदारी करताना SRHचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, कॅमेरून ग्रीनने MIला मार्करामची ( २२) विकेट मिळवून दिली. त्यानंतर आलेला अभिषेक शर्मा ( १) पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

 हेनरिच क्लासेन आणि अग्रवाल खिंड लढवत होते, परंतु SRHला १२च्या सरासरीने धावांची गरज होती. १४व्या षटकात क्लासेनने पीयुषला टार्गेट करताना ४,६,६,४ अशा धावा चोपून थोडसं दडपण कमी केलं. पण, पीयुषने डाव साधला अन् अखेरच्या चेंडूवर क्लासेनची विकेट काढली. क्लासेन १६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३६ धावांवर माघारी परतला. क्लासेनने मयांकसह ५५ धावांची भागीदारी केली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अब्दुल समदला मैदानावर उतरवले. पुढच्याच षटकात SRHचा सेट फलंदाज मयांक ४८ धावांवर झेलबाद झाला. मुंबईने इथून सामन्यात पुनरागमन केले. मार्को यान्सेनने काही फटके मारून SRHच्या चाहत्यांना आशेची किरण दाखवली, परंतु तोही अपयशी ठरला. वॉशिंग्टन सुंदरने एक धाव हलक्यात घेतली अन् तो १० धावांवर रन आऊट झाला. हैदराबादला १० बाद १७८ धावाच करता आल्या. जेसन, मेरिडिथ व पीयुष यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ६ चेंडूंत २० धावा हवा असताना अर्जुनला शेवटचे षटक दिले अन् त्याने चांगली गोलंदाजी केली. अर्जुनने भुवनेश्वर कुमारची विकेट घेत मॅच संपवली.

तत्पूर्वी, रोहित शर्मा विक्रम करून माघारी परतल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला. इशान किशन ( ३८), कॅमेरून ग्रीन ( ६४*) यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. हैदराबादचा लोकल बॉय तिलक वर्मा ( Tilak Verma) ने कॅमेरून ग्रीनसह मुंबईच्या धावांचा वेग वाढवला. मुंबईने शेवटच्या सहा षटकांत २ बाद ८३ धावा कुटल्या. रोहित १८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर बाद झाला. १२व्या षटकात इशान ( ३८) आणि  सूर्यकुमार यादव ( ७) यांना मार्को यान्सेनने बाद केले. तिलक आणि ग्रीन यांनी २८ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. तिलक १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला. मुंबईने ५ बाद १९२ धावा केल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादअर्जुन तेंडुलकर
Open in App