IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयाची नोंद केली. मयांक मार्कंडेच्या उल्लेखनीय गोलंदाजीनंतर राहुल त्रिपाठीने फलंदाजीत कमाल दाखवताना पंजाब किंग्सला पराभवाची चव चाखवली. पंजाबचे फलंदाज ढेपाळत असताना कर्णधार शिखर धवन मैदानावर उभा राहिला आणि त्याने नाबाद ९९ धावांची खेळी करून SRHसमोर १४४ धावांचे लक्ष्य उभे केले. हैदराबादची सुरुवात काही खास झाली नाही, परंतु राहुल ( Rahul Tripathi) ने चांगले फटके मारताना विजय पक्का केला.
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला LBW केले. त्यानंतर मार्को यान्सनने दोन षटकांत मॅथ्यू शॉर्ट ( १) व जितेश शर्मा ( ४) यांची विकेट घेतली. सॅम करन ( २२) झेलबाद झाला. सिकंदर रझा ( ५) व शाहरुख खान ( ४) बाद झाले. मयांक मार्कंडेने १५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पण, कर्णधार शिखर मैदानावर उभा राहिला. मोहित राठीला सोबत घेऊन शिखरने दहाव्या विकेटसाठी अर्धशतकी + धावांची भागीदारी केली. पंजाबने २० षटकांत ९ बाद १४३ धावा केल्या. धवनने ६६ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या.
मयांक अग्रवालसोबत आज सलामीला हॅरी ब्रुक आला आणि त्याने काही सुरेख फटकेही मारले. पण, अर्शदीप सिंगने अप्रतिम चेंडूवर ब्रुकचा ( १३) दांडा उडवला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीला जीवदान मिळाले. राहुलला यंदाच्या पर्वात अद्याप तरी काही खास कामगिरी करता आलेली नाही आणि हा जीवदान त्याला मोठी खेळी करण्याची संधी देणारा ठरणारा होता. चांगला खेळ करणाऱ्या मयांकला ( २१) राहुल चहरने बाद करून SRH ला मोठा धक्का दिला. पण, या विकेटनंतर त्रिपाठीने गिअर बदलला अन् पाच चौकार खेचून हैदराबादला १०षटकांत २ बाद ६८ धावांपर्यंत नेले.
त्रिपाठी आज पंजाबच्या गोलंदाजांना जुमानणारा नव्हता आणि त्याने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आयपीएलचे ११वे अर्धशतक षटकाराने पूर्ण केले. आज पहिलाच सामना खेळणाऱ्या मोहित राठीला SRHच्या त्रिपाठीने टार्गेट बनवले अने त्याच्या दोन षटकांत २९ धावा चोपल्या. यापैकी २१ धावा या दुसऱ्या षटकात आल्या. कर्णधार एडन मार्करामनेही सुरेख खेळी केली. या दोघांनी ५२ चेंडूंत १०० धावांची भागीदारी करताना हैदराबादला १७.१ षटकांत २ बाद १४५ धावा करून विजय निश्चित करून दिला. त्रिपाठीने ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७४, तर मार्करामनं २१ चेंडूंत नाबाद ३७ धावा केल्या.
Web Title: IPL 2023, SRH vs PBKS Live : Eight-wicket win for Sunrisers Hyderabad, Rahul Tripathi scored 74* (48) with 10 fours and 3 sixes.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.