IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सचा डाव गडगडला होता, परंतु कर्णधार शिखर धवनने ( Shikhar Dhawan) सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. पंजाबकडून कर्णधार शिखर धवन एकटा लढला अन् संघाच्या निम्म्या धावा त्याने केल्या. शिखरने यंदाच्या पर्वातील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना आयपीएल २०२३ मध्ये पुन्हा एकदा ऑरेंज कॅप नावावर केली. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सचा माजी फिरकीपटू मयांक मार्कंडेने ४ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि उम्रान मलिक यांनी चांगली गोलंदाजी केली.
आयपीएल २०२३ मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या हैदराबादने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला LBW केले. त्यानंतर मार्को यान्सनने त्याच्या दोन षटकांत मॅथ्यू शॉर्ट ( १) व जितेश शर्मा ( ४) यांची विकेट घेत PBKS ची अवस्था ३ बाद २२ अशी केली. पण, कर्णधार शिखर धवन खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभा होता. आयपीएल २०२३ मधील महागडा खेळाडू सॅम करनला आज पुढे फलंदाजीला येण्याची संधी मिळाली आणि त्याने धवनसह चांगली खेळी केली होती. पण, मयांक मार्कंडेने त्याच्या पहिल्याच षटकात करनला ( २२) झेलबाद करून धवनसोबतची ४१ धावांची भागीदारी तोडली.
इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेला सिकंदर रझा ( ५) फार कमाल करू शकला नाही. उम्रान मलिकने त्याची विकेट काढली. मयांकने आजच्या सामन्यातील दुसरी विकेट घेताना शाहरुख खान ( ४) यालाही पायचीत केले. उम्रानने पुढील षटकात हरप्रीत ब्रारचा त्रिफळा उडवला अन् पंजाबची अवस्था ७ बाद ७७ अशी वाईट केली. पुढच्याच चेंडूवर राहुल चहरची झेलबाद झाला असता, परंतु यष्टिरक्षकाने झेल टाकला. धवन नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहून ही पडझड पाहत होता. मार्कंडेने तिसरी विकेट घेताना राहुल चहरला बाद केले. मार्कंडेने त्याच्या अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गुगली टाकून नॅथन एलिसचा त्रिफळा उडवला. मार्कंडेने १५ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
मोहित राठीला सोबत घेऊन शिखर धवनने २०व्या षटकापर्यंत खिंड लढवली अन् PBKSला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. पंजाबने २० षटकांत ९ बाद १४३ धावा केल्या आणि अखेरच्या विकेटसाठी ५३ धावांची विक्रमी भागीदारी केली. धवनने ६६ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या.