IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) प्रत्येक सामन्यात उपस्थित असते अन् चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.. तिचा सुंदर चेहरा अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा असतो, तर ती नाराज झाली तर सोशल मीडियावर सहानभूतीची लाट पसरले... आयपीएल २०२३ मध्ये SRHला अद्याप विजय मिळवता आलेला नाही आणि आज ते सहज विजय मिळवतील असे वाटत होते. त्यामुळे काव्या आनंदात होती. मात्र, शिखर धवनच्या Shikhar Dhawan खेळीने तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेतलं...
आयपीएल २०२३ मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या हैदराबादने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला LBW केले. त्यानंतर मार्को यान्सनने त्याच्या दोन षटकांत मॅथ्यू शॉर्ट ( १) व जितेश शर्मा ( ४) यांची विकेट घेतली. सॅम करन ( २२) झेलबाद झाला. सिकंदर रझा ( ५) व शाहरुख खान ( ४) बाद झाले. मयांक मार्कंडेने १५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पण, कर्णधार शिखर मैदानावर उभा राहिला. मोहित राठीला सोबत घेऊन शिखर धवनने २०व्या षटकापर्यंत खिंड लढवली अन् PBKSला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. पंजाबने २० षटकांत ९ बाद १४३ धावा केल्या आणि अखेरच्या विकेटसाठी ५३ धावांची विक्रमी भागीदारी केली. धवनने ६६ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या.
आयपीएलमध्ये ९९ धावांवर नाबाद राहणारा धवन चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी सुरेश रैना ( वि. हैदराबाद, २०१३), ख्रिस गेल ( वि. बंगळुरू, २०१९) आणि मयांक अग्रवाल ( वि. दिल्ली, २०२१) यांना शतक पूर्ण करता आले नव्हते.