IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयाची नोंद केली. मयांक मार्कंडेच्या उल्लेखनीय गोलंदाजीनंतर राहुल त्रिपाठीने फलंदाजीत कमाल दाखवताना पंजाब किंग्सवर ८ विकेट्सने विजय मिळवला. पण, पुन्हा एकदा चर्चेत आली ती SRHची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran)...
विजयासाठीच्या १४४ धावांचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक ( १३) व मयांक अग्रवाल ( २१) हे सलामीवीर झटपट माघारी परतले. राहुल त्रिपाठी आणि कर्णधार एडन मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूंत शतकी भागीदारी करताना विजय पक्का केला. हैदराबादने १७.१ षटकांत २ बाद १४५ धावा करून विजय निश्चित केला. त्रिपाठीने ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७४, तर मार्करामनं २१ चेंडूंत नाबाद ३७ धावा केल्या.
तत्पूर्वी, पंजाबच्या धडाधड विकेट पडूनही कर्णधार शिखर धवन खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभा राहिला होता. मोहित राठीला सोबत घेऊन शिखरने दहाव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. पंजाबने २० षटकांत ९ बाद १४३ धावा केल्या. धवनने ६६ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. शिखरची फटकेबाजी सुरू असताना कॅमेरामनने कॅमेरा SRHची मालकीण काव्या मारनकडे वळवला अन् तिला राग अनावर झाला. तिने कॅमेराकडे पाहून 'हट रे' असे शब्द उच्चारले आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.