IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३च्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सने २०४ धावांचा ठेवलेला भार SRHचा संघ पेलवू शकला नाही आणि ७२ धावांनी त्यांना हार पत्करावी लागली. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात SRHचे खेळाडू अपयशी ठरले आणि घरच्या मैदानावर झालेल्या या पराभवामुळे चाहते नाराज झाले. काही नाराज चाहत्यांनी तर SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) हिच्यासमोर फलक झळकावून नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी त्यामागचं कारणंही त्यावर लिहिलं.
IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई, दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा
आयपीएल २०२३च्या ऑक्शनपूर्वी SRHने केन विलियम्सन व निकोलस पूरन या दोन माजी कर्णधारांना बाहेरचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी त्यांनी डेव्हिड वॉर्नर ज्याने २०१६मध्ये जेतेपद पटकावून दिले, त्यालाही बाहेर केले. त्यामुळे SRHच्या स्ट्रॅटजीवर नाराजीचा सूर होताच. यंदाच्या पर्वात एडन मार्करामवर त्यांनी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली, परंतु दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. नेदरलँड्सविरुद्धच्या वन डे सामन्यामुळे आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलमध्ये सध्यातरी सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे आज भुवनेश्वर कुमारने नेतृत्व केले, परंतु त्याला अपयश आले.
राजस्थान रॉयल्सच्या ५ बाद २०३ धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादला ८ बाद १३१ धावाच करता आल्या आणि राजस्थानने ७२ धावांनी सामना जिंकला. वॉर्नर आणि केन यांना संघातून काढल्याने चाहते अजूनही नाराज आहेत आणि त्यांनी फलकाद्वारे ती व्यक्त केली. आजच्या सामन्यात RRचा चिअर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.