Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2023: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला सहज पराभूत केले. सूर्यकुमार यादवच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने १७व्या षटकातच सामन्याचा निकाल लावला. सूर्या नावाच्या वादळात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे गोलंदाज उडून गेले. सूर्यकुमार यादवने मॅचविनिंग इनिंग खेळली पण सामन्यानंतर देण्यात येणाऱ्या एका पुरस्काराबद्दल एक चूक झाल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर ही चूक कोणाची? हे देखील कोडंच आहे.
पॉवरप्लेमध्येच दोन धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार आला, त्याने मुंबई इंडियन्सचा डाव वेगाने पुढे नेला. आणि शेवटपर्यंत लढून संघाला विजयाच्या नजीक पोहोचवले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याला अनेक पुरस्कार मिळाले. पण, तरीही एक पुरस्कार असा होता ज्यात एक गोंधळ झाल्याचे दिसून आले. 35 चेंडूत 83 धावा फटकावल्यानंतरही सूर्याला एक असा पुरस्कार मिळाला, ज्यावर त्याचा अधिकारच नव्हता. जो पुरस्कार सूर्याला देण्यात आला, तो चुकीचा होता. आता हे चुकून घडले की नक्की काय झाले, हे सध्या तरी माहीती नाही. पण, मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामना संपल्यानंतर हा प्रकार घडला आहे.
नक्की काय घडलं?
तुम्ही विचार करत असाल की असा कोणता पुरस्कार आहे, जो सूर्याऐवजी दुसऱ्याला मिळायला हवा होता. तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा पुरस्कार रुपे ऑन द गो 4s पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामान्यतः सामन्यात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूला दिला जातो. सूर्याने सामन्यात ७ चौकार मारले, पण ग्लेन मॅक्सवेल याबाबतीत त्याच्या पुढे होता. त्याने ८ चौकार खेचले होते. पण पुरस्कार मात्र सूर्याला देण्यात आला.
सामन्यानंतर सूर्याच्या पुरस्कारांचा मुंबई इंडियन्सने शेअर केला, त्याततही चौकारांचा अवार्ड त्याच्याकडे होता. त्यामुळे प्रश्न असा आहे की चूक झाली असेल तर ती कोणी केली? ज्यांनी पुरस्काराची यादी बनवली किंवा ज्यांनी ती कॅमेऱ्यात वाचली. प्रश्न असाही आहे की चुकून असे घडले असेल तर हा पुरस्कार ग्लेन मॅक्सवेलला दिला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.