मुंबई - दोन दिवसांपासून उत्कंठा वाढवलेल्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांनी अखेर मध्यरात्री विजयाचा जल्लोष केला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नईच्या रविंद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला अन् जगभरात सीएसकेसह कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं कौतुक सुरू झालं. थांबलेल्या पावसानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर धोनीच्या अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आपल्या कामातून आणि कृतीतून तो नेहमीच चाहत्यांची मने जिंकतो. यंदाच्या आयपीएल २०२३ ची ट्रॉफी स्विकारताना धोनीने दाखवलेल्या मोठेपणामुळे पुन्हा एकदा तो ग्रेट असल्याचे दिसून आले.
आयपीएल २०२३ च्या अंत्यंत रोमहर्षक सामन्यात जडेजाच्या चौफेर फटकेबाजीमुळे सीएसकेला विजय मिळलवा. शेवटच्या चेंडूपर्यंत चेहऱ्यावर शांत आणि कॅप्टन कुल असे भाव घेऊन असलेला धोनी विजयानंतर आनंदी झाला. जडेजाच्या चौकारमुळे कोट्यवधी चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. देश-विदेशातून सीएसकेसह धोनीचं अभिनंदन सुरू झालं. मध्यरात्री गाढ झोपेत असल्याने अनेकांनी सकाळी शेवटची ओव्हर पाहिली. त्यानंतर, धोनीच्या संघाचं कौतुक केलं. या सामन्यात धोनीला शुन्यावरच बाद व्हावे लागले. मात्र, त्यांच्या टीम व्यवस्थापनामुळेच सीएसके इथपर्यंत पोहोचली आणि आयपीएल २०२३ ची ट्रॉफी टीमने उंचावली.
दरम्यान, सीएसके विरुद्ध गुजरात यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वीच सीएसकेचा तडाखेबाज फलंदाज अंबाती रायडू याने आपली निवृत्ती जाहीर केली होती. धोनीचा हा शेवटचा सामना असेल असे अनेकांना वाटले. पण, धोनी ऐवजी अंबाती रायडूनेच निवृत्ती घोषित केली. त्यामुळे, सर्वांनीच रायडूलाही पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. धोनीने अंबाती रायडूच्या या निवृत्तीचा सन्मान केला. २०२३ च्या चॅम्पियनशीपची ट्रॉफी स्विकारण्यासाठी धोनीने अंबाती रायडूला आपल्यापुढे बोलावले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बेन्नी आणि सरचिटणीस जय शहा यांनी जेव्हा ट्राफी देण्यासाठी धोनीकडे पाहिले. त्यावेळी, धोनीने अंबाती रायडूला पुढे करत २०२३ ची ट्रॉफी स्विकारण्याचा बहुमान त्याला दिला. तसेच, विजयवीर रविंद्र जडेजाही यावेळी सोबतच होता. धोनी स्वत: बीसीसीआय अध्यक्षांच्या बाजुला उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.
धोनीच्या खेळीचं, त्याच्या कर्णधारकीचं नेहमीच कौतुक केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्या खिलाडू वृत्तीचं आणि माणूसकीचंही नेहमी कौतुक होतं. म्हणूनच, मुंबई इंडियन्सचे फॅन असणारेही सीएसकेच्या बाजुने आपला कौल देतात, तो केवळ धोनीसाठीच. धोनीने अंबाती रायडूला दिलेल्या सन्मानामुळे चाहत्यांसाठी पुन्हा एकदा धोनीच ग्रेट असल्याची भावना त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.