अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या पर्वाचा थरार शुक्रवारपासून रंगणार आहे. सलामी लढतीत गतविजेता गुजरात टायटन्स आणि चारवेळेचा विजेता चेन्नई सुपरकिंग्स परस्परांविरुद्ध खेळण्यास सज्ज झाले आहेत.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने १५ व्या मोसमात पदार्पणातच विजेते होण्याची कामगिरी केली. दुसरीकडे, अनुभवी महेंद्रसिंग धोनीचा संघदेखील सलामीला विजय मिळवून गुजरातच्या विजयाची हॅट्ट्रिक होऊ द्यायची नाही, या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
हेड टू हेड
२०२२ ला उभय संघांत दोन साखळी सामने झाले. दोन्ही सामन्यांत गुजरातने सीएसकेवर मात केली. पहिल्या सामन्यात ३ तर दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून मात केली होती. उभय संघांमध्ये पहिला सामना पुण्यात तर दुसरा मुंबईत खेळला गेला. पुण्यातील लढतीत डेव्हिड मिलरच्या ५१ चेंडूंतील ८ चौकार आणि सहा षट्कारांमुळे नाबाद ९४ धावांच्या बळावर विजय साजरा केला होता. मुंबईत यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाच्या ५७ चेंडूंतील ८ चौकार आणि एका षट्कारासह काढलेल्या नाबाद ६७ धावांमुळे सामना ७ गड्यांनी जिंकला.
गुजरातला हॅट्ट्रिकची संधी
शुक्रवारी गुजरातला चेन्नईविरुद्ध विजय मिळवून हॅट्ट्रिक नोंदविण्याची संधी असेल. सीएसकेदेखील या संघाविरुद्ध पहिल्या विजयास उत्सुक असेल. त्यामुळे दोन्ही संघांपैकी कोण बाजी मारतो, हे पाहावे लागेल.
इम्पॅक्ट’ खेळाडूंमुळे रोमांच
यंदापासून ‘इम्पॅक्ट’ खेळाडूचा नवा नियम लगू होत आहे. अशावेळी आपल्या बलस्थानांचा विचारपूर्वक वापर करणारा धोनी गरजेनुसार स्वत:ला ‘इम्पॅक्ट’ खेळाडू बनवू शकतो.
रवींद्र जडेजाचा अडसर
गुजरातच्या मार्गात रवींद्र जडेजा सर्वांत मोठा अडसर ठरू शकतो. २०२२ ला १६ कोटींमध्ये रिटेन करण्यात आलेला जडेजा तुफानी फलंदाजी करतोच, शिवाय गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तरबेज आहे. तो एकट्याच्या बळावर सामना फिरवू शकतो. मागील ४-५ वर्षांत फलंदाजीत तो उत्कृष्ट ठरला आहे. जडेजा फॉर्ममध्ये असल्यास यंदा सीएसकेला पाचवे जेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावू शकतो. आयपीएलमध्ये त्याने १३२ गडी बाद केले असून २५०२ धावा केल्या आहेत. अलीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वन डे मालिकेत त्याने उपयुक्त योगदान दिले होते. चेन्नई संघ स्पर्धेत सर्वांत अनुभवी संघांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात संघाने अनेकदा शानदार कामगिरी केली. यंदा हा संघ काही बदलांसह मैदानात उतरणार आहे. बेन स्टोक्सवर संघाने मोठा खर्च केला. स्टोक्स हा इंग्लंडचा स्फोटक खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत तो मॅचविनर ठरतो. सीएसकेला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
उभय संघ यातून निवडणार
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, कोना भरत, रिद्धिमान साहा, केन विल्यमसन, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, प्रदीप सांगवान, आर. साईकिशोर, विजय शंकर, साई सुदर्शन, राशिद खान, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, दर्शन नळकांडे, जोश लिटिल, यश दयाल, जयंत यादव, नूर अहमद, अल्झारी जोसेफ.
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), डेव्होन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, सिसांडा मगाला, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अहय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, मिशेल सेंटनर, सुभ्रांशू सेनापती, सिमरजीत सिंग, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.