आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज आयपीएलमध्ये गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. दरम्यान, या सामन्यात चेन्नईची फलंदाजी सुरू असताना महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. वयाच्या ४१ व्या वर्षीही धोनीने आपल्या बॅटमध्ये ती जुनी ताकद कायम असल्याचं दाखवून दिलं. त्याने शेवटच्या षटकात षटकार चौकार ठोकत दोनशेच्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली. यादरम्यान धोनीनं षटकांरांचा एक खास रेकॉर्डही आपल्या नावे केला.
गतविजेत्या गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. चेन्नईने २० षटकांत ७ बाद १७८ धावा कुटल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ९२ धावा कुटल्या. तर महेंद्रसिंग धोनीने चेन्नईच्या डावाला फिनिशिंग टच दिला. त्याने दोनशेच्या स्ट्राईक रेटने ७ चेंडूत नाबाद १४ धावा काढल्या.
या सामन्यात धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याने ७ चेंडूत १४ धावांची छोटेखानी खेळी केली. यादरम्यान, धोनीने एक चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचला. त्याने जोशुआ लिटलला ठोकलेला हा षटकार डीप स्क्वेअर लेकच्या दिशेने थेट स्टेडियमच्या छतावर पोहोचला. त्यानंतर धोनीने पुढच्याच चेंडूवर चौकार हाणला.
दरम्यान, धोनीने षटकारांबाबत एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये कुठल्याही एका संघासाठी २०० षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनीने स्थान मिळवले आहे. धोनीने चेन्नई सुपरकिंग्ससाठी २०० षटकार ठोकले आहेत. या यादीमध्ये ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. त्याने आरसीबीकडून खेळताना २३९ षटकार ठोकले आहेत. तर एबी डिव्हिलियर्सने आरसीबीकडून खेळताना २३८ षटकार खेचले आहेत. या यादीमध्ये कायरन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने मुंबईकडून खेळताना २२३ षटकार खेचले आहेत. तर विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना २१८ षटकार खेचले आहेत.