गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने जबरदस्त पुनरागमन करत गुजरात टायटन्सला ५ धावांनी नमवले. यासह दिल्लीने तिसरा विजय मिळवला, तर या पराभवानंतरही गुजरातचे अव्वल स्थान कायम राहिले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला २० षटकांत ८ बाद १३० धावाच करता आल्या. परंतु, यानंतर त्यांनी गुजरातला २० षटकांत ६ बाद १२५ धावांवर रोखले. अमन खानचे झुंजार अर्धशतक दिल्लीच्या विजयात निर्णायक ठरले.
दिल्लीच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई, पंजाब आणि आरसीबीचं समीकरण बदललं आहे. गुणतालिकेत आता चांगली स्पर्धा रंगली आहे. आरसीबी, मुंबई, आणि पंजाब आता अशा स्थितीत आहे की, जर त्यांचा एक जरी पराभव झाला, तर मोठा फटका बसू शकतो आणि आयपीएल २०२३ च्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचण्याचं स्वप्न अपुरं राहु शकतं.
गुणतालिकेत दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतरही गुजरात पहिल्या स्थानावर आहे. तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आणि चेन्नई चौथ्या स्थानावर आहे. आरसीबी १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर पंजाब सहाव्या क्रमांकावर, मुंबई सातव्या क्रमांकावर, कोलकाता आठव्या क्रमांकावर, हैदराबाद नवव्या स्थानावर आणि दिल्ली ६ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
ऑरेंज कॅप-
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आतापर्यंत ९ सामन्यात ४६६ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने ९ सामन्यांत ४२८ धावा केल्या असून, तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा कॉनवे आहे. कॉनवेने ९ सामन्यात ४१४ धावा केल्या आहेत. यानंतर कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत ९ सामन्यात ३६४ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, पाचव्या क्रमांकावर गायकवाड आहे, ज्याच्या सध्या ९ सामन्यांत ३५४ धावा आहेत.
पर्पल कॅप-
मोहम्मद शमी पहिल्या क्रमांकावर आहे, शमीने ९ सामन्यात १७ विकेट घेत पर्पल कॅपचा ताबा घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तुषार देशपांडे आहे, ज्याने ९ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर आरसीबीच्या मोहम्मद सिराजचा नंबर लागतो. सिराजने ९ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खान चौथ्या क्रमांकावर आहे. राशिदने ९ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंग पाचव्या क्रमांकावर आहे. अर्शदीपने आतापर्यंत ९ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत.