आयपीएलमध्ये आज होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आरसीबीला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. आरसीबीने १३ सामन्यांमधून १४ गुण मिळवले असून ते गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहेत. तर मुंबई इंडियन्सचेही १३ सामन्यांमधून १४ गुण झालेले आहेत. मात्र खराब धावगतीमुळे ते पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबईचा सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबादच्या संघाशी होणार आहे. मात्र आजच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचं प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न तुटू शकतं.
बंगळुरू आणि गुजरातच्या संघांमधील सामना हा आज संध्याकाळी बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. मात्र Accuwaehter च्या रिपोर्टनुसार बंगळुरूमध्ये संध्याकाळी ७ वाजता ६५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हा सामना ७.३० वाजता सुरू होणार आहे. त्याचदरम्यान, रात्री ८ वाजता पावसाची ४९ टक्के शक्यता आहे. रात्री ९ वाजता ही शक्यता वाढून ६५ टक्के तर रात्री १० आणि ११ वाजता अनुक्रमे ४० आणि ३४ टक्के पावसाची शक्यता आहे.
आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. असा परिस्थितीत आरसीबीचे १४ सामन्यांमधून १५ गुण होतील. तर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं तर मुंबईचे १६ गुण होतील आणि मुंबईचा संघ थेट प्लेऑफमध्ये पोहोचेल. पावसामुळे राजस्थान रॉयल्सची अपेक्षाही संपुष्टात येईल. राजस्थानचे १४ सामन्यांमधून १४ गुण झालेले आहेत. जर मुंबई आणि आरसीबी आज पराभूत झाले तरच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची अंधुकशी संधी असेल. यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ एक सामना पावसामुळे रद्द झाला आगे. चेन्नई आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता.
दरम्यान, विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने ५०० हून अधिक धावा जमवल्या आहेत. तसेच त्यात एका शतकाचाही समावेश आहे. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आतापर्यंत ७०२ धावा कुटून काढल्या आहेत. ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे.