IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने सलग दोन पराभवानंतर अखेर मंगळवारी विजयाची चव चाखली. दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा, इशान किशन व तिलक वर्मा यांनी चांगली फटकेबाजी केली. पण, दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले अन् मुंबईला धापा टाकण्यास भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर टीम डेव्हिडने चतुराईने दोन धावा घेत मुंबईचा पहिला विजय पक्का केला. त्यानंतर रोहितचे पत्नी रितिकाने व्हिडीओ कॉल करून अभिनंदन केले. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार थेट चाहत्यांना भेटण्यासाठी गेला अन् फॅन्सच्या आनंदासमोर गगन ठेंगणे वाटू लागले...
सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धोका; विराट कोहलीचा कट्टर स्पर्धक घेणार जागा
डेव्हिड वॉर्नर ( ५१) व अक्षर पटेल ( ५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने १७२ धावा केल्या. मुंबईच्या पीयुष चावला व जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा व इशान किशन ( ३१) यांनी तशी आश्वासक सुरूवातही करून दिली होती. त्यात तिलक वर्माने जबरदस्त फटकेबाजी करून मॅच MI च्या हातात आणून ठेवली. तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या चेंडूपर्यंत सामना नेला... मोक्याच्या क्षणी तिलक वर्माची ( ४१) विकेट पडली, त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माला ( ६५) DC गोलंदाज मुस्ताफिजूरने तंबूचा रस्ता दाखवला.
अखेरच्या षटकात ५ धावा ज्या सहज शक्य होत्या, त्याही करण्यासाठी एनरिच नॉर्खियाने मुंबईला घाम गाळायला लावला. मुकेश कुरमाच्या हातून कॅमेरून ग्रीनचा झेल सुटला. तिसऱ्या चेंडूवर अम्पायरने Wide चेंडू दिला अन् वॉर्नरच्या DRS मुळे निर्णय बदलला गेला. ३ चेंडूंत ४ धावा मुंबईला करायच्या होत्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना ग्रीन व टीम डेव्हिड यांनी त्या काढल्या अन् मुंबईने विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"