आयपीएलमध्ये काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर शेवटच्या षटकात मात केली. त्याबरोबरच आयपीएलच्या गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात गुजरातच्या विजयामध्ये अनेक खेळाडू चमकले. मात्र या सामन्याचा मानकरी ठरला तो मोहित शर्मा. तो २०२० नंतर पहिला सामना खेळत होता. मात्र हातात चेंडू येतात त्याने सर्व दडपण झुगारत जबरदस्त गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने ४ षटकांमध्ये केवळ १८ धावा देत केवळ २ बळी टिपले. या कामगिरीसाठी मोहित शर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला.
मात्र हाच मोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून सहभागी झाला होता, असं सांगितल्यास कुणाला खरं वाटणार नाही. मोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१५ च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडून खेळला होता. मात्र दुखापतींनी त्रस्त झालेल्या मोहित शर्मावर सर्जरी झाल्यानंतर २०२० मध्ये त्याला आयपीएलमधील कुठल्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मोहित शर्मा सांगतो की, गुजरात संघाचा प्रशिक्षक आशिष नेहरा याचा मला फोन आला होता. त्याने मला गुजरातसाठी नेट बॉलर बनण्याची ऑफर दिली. तेव्हा घरी बसून तरी काय करणार, असा विचार करत आशिष नेहराने दिलेली ऑफर स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि मी गुजरात टायटन्सचा नेट बॉलर बनलो. मात्र नेटमध्ये बॉलिंग करता करता मोहित शर्माला गुजरातकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.
दरम्यान, गुजरात टायटन्सने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये मोहम्मद शमी मोहित शर्माला प्रश्न विचारताना दिसत आहे. गुजरातसाठी पहिला सामना, आयपीएलमध्ये कारकीर्दिची १० वर्षे पूर्ण झाली आहेत, कसं वाटतंय, असा प्रश्न शमीनं विचारल्यावर मोहित शर्मा म्हणाला की, चांगलं वाटतंय. आजच माझ्या आयपीएलमधील पदार्पणाला १० वर्षे पूर्ण झाल्याचं समजलंय. या गोष्टींमुळे चांगलं वाटतं. एकंदरीत आज मला खूप बरं वाटतंय, असे मोहितने सांगितले. तसेच ही चांगली कामगिरी स्वर्गीय वडिलांना समर्पित केली.