आयपीएलमधील हॉट फेवरेट संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सध्या काहीसा अडचणीत आलेला आहे. चेपॉकवर राजस्थानकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे चेन्नई सुपरकिंग्सला धक्का बसला आहे. त्यातच कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे चेन्नईचा संघ अडचणीत आलेला आहे. दरम्यान, आता पुढच्या सामन्यापर्यंत महेंद्रसिंग धोनी फिट झाला नाही तर संघाचं नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न पडला आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने तुफानी खेळ केला होता. हा धोनीचा आयपीएलमधील २०० वा सामना होता. मात्र या सामन्यात धोनी दुखापतग्रस्त झाला. तसेच सामन्यानंतर तो लडखडताना दिसला. दरम्यान, चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, आमच्या संघातील अनेक खेळाडू जखमी आहेत. मात्र हे केवळ आमच्या संघासोबत घडत नाही आहे. अनेक संघ या समस्येचा सामना करत आहेत. धोनीला दुखापत झाली आहे, असेही फ्लेमिंग यांनी सांगितले. मात्र त्यांनी धोनी पुढच्या सामन्यात खेळेल का? याबाबत काही माहिती दिलेली नाही.
धोनी दुखापतग्रस्त असून, सीएसचेका पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी धोनी फिट झाला नाही तर त्याच्य अनुपस्थितीत चेन्नईचं नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्यावर्षी रवींद्र जडेजाने पाच सामन्यांत चेन्नईचं नेतृत्व केलं होतं. मात्र त्यापैकी ४ सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. तर एका सामन्यात चेन्नईला विजय मिळाला होता. अशा परिस्थितीत धोनीच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजाकडे चेन्नईचं नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता कमी आहे.
बेन स्टोक्स आणि ऋतुराज गायकवाड यांच्याकडे धोनीचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे, असे मोईन अली म्हणाला होता. मात्र बेन स्टोक्स जखमी आहे. अशा परिस्थितीत मोईन अलीकडेही कर्णधारपद चालून येऊ शकते. मोईन अलीच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे झालेल्या ७ टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पाकिस्तानवर ४-३ असा विजय मिळवला होता.
दरम्यान, धोनीला पर्याय म्हणून ऋतुराज गायकवाडकडेही पाहिजे जात आहे. चेन्नईसाठी त्याचं नाव हा एक पर्याय असू शकतो. तसेच चेन्नईच्या संघात अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. त्याच्याकडेही आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. मात्र तो पहिल्यांदाच चेन्नईकडून खेळत आहे. अशा परिस्थितीत कर्णधारपद त्याच्याकडे सोपवले जाईल की नाही हा एक प्रश्नच आहे.