IPL 2023, Rinku Singh : हार के जितने वाले को बाजीगर कहते है! बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याच्या 'बाजीगर' चित्रपटातील डायलॉग रिंकू सिंगने रविवारी खरा करून दाखवला... राशीद खानने हॅटट्रिक घेऊन इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यरच्या मेहनतीवर जवळपास पाणी फिरवलेच होते, परंतु रिंकू मैदानावर आला अन् गुजरात जायंट्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. यश दयालच्या अखेरच्या षटकात रिंकूने सलग पाच षटकार खेचून कोलकाता नाइट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
आयपीएलमध्ये लाखो कमावणाऱ्या रिंकू सिंगच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे माहित्येय?
अत्यंत गरीब घरातून आलेल्या अलिगढच्या पोराचा संघर्ष सर्वांना अचंबित करणारा आहे. घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना क्रिकेटचा महागडा शौक जपणे अवघड.. त्यामुळे घरच्यांचा रिंकूच्या क्रिकेट खेळण्यास विरोध होताच. अनेकदा वडिलांचा मारही त्याला खावा लागला होता, मात्र भावांनी रिंकूला साथ दिली. कुटुंबाला रिंकू क्रिकेट खेळणे आवडत नव्हते, पण २०१२ मध्ये रिंकूने शाळेच्या स्पर्धेत बाईक जिंकली तेव्हा कुटुंबाचे मत बदलू लागले. सुरुवातीला रिंकूने क्रिकेटमधून कमावलेले पैसे कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी गेले.
रिंकूने २०१७ पासून आयपीएल खेळायला सुरुवात केली. २०१७ मध्ये रिंकूला पहिल्यांदा पंजाब किंग्सने खरेदी केले होते. त्याला १० लाख रुपये मानधन मिळाले.कोलकाता नाइट रायडर्सने त्याला ८० लाख रुपयांना २०१८ मध्ये आपल्या ताफ्यात घेतले. २०२२ मध्ये रिंकू सिंग रिलीज झाला आणि त्यानंतर KKR ने या बॅट्समनला ५५ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलमधून ५५ लाखांची कमाई करणाऱ्या रिंकूचे वडील आजही घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचं काम करतात. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
रिंकूने पुढे देशासाठी खेळावे, अशी त्याच्या आईची इच्छा आहे. क्रिकेटला विरोध करणाऱ्या वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतो. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत रिंकूचे वडील म्हणाले, मी रिंकूला क्रिकेट खेळू नको म्हणायचो. शिक्षणात त्याला रस नव्हता. स्टेडियमला जायचा आणि क्रिकेट खेळायचा. तेव्हा लोक त्याच्या फटकेबाजीबाबत मला सांगायचे. माझ्या मुलाने खूप काही केलंय. घरची परिस्थिती कठीण होती. आता परिस्थिती सुधारलीय. त्याने मला पाच वर्षांपुर्वीच काम सोडायला सांगितलं होतं. पण मी नकार दिला. काम करायचं बंद केलं तर हातपाय चालणार नाहीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"