आयपीएलचा सोळावा हंगाम ऐन रंगात आला असतानाच क्रिकेटप्रेमींचा हिरमोड करणारी एक बातमी समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यावरच सोडू शकतात. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये इंग्लंडमधील केनिंगटन ओव्हल येथे ७ ते ११ जून दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी शिवसुंदर दास यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती लवकरच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यासोबत भारतीय संघातील काही खेळाडू हे २३ किंवा २४ मे रोजी लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल द्रविड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २३ किंवा २४ मे च्या आसपास लंडनला रवाना होईल. काही कसोटीपटू त्यांच्या आयपीएल संघांसोबत असलेल्या कमिटमेंट्स पूर्ण झाल्यानंतर रवाना होतील. काही कसोटीपटू हे राहुल द्रविड याच्यासोबत जातील. कारण त्यांच्या संघांचं आयपीएलमधील अभियान तोपर्यंत संपुष्टात आलेलं असेल. त्यामुळे जर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचले नाहीत तर या यादीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांचाही समावेश होईल.
मात्र कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर अनेक आव्हाने असतील. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या दुखापतीने संघाचं टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला पुन्हा संघात बोलावले जाऊ शकते. तसेच सूर्यकुमार यादवकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने अजिंक्य रहाणेच्या नावाला प्राधान्य देऊ शकतात. सलामीसाठी के.एल. राहुल आणि रोहित शर्मा यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्यास शुभमन गिलला मधल्या फळीत खेळावे लागेल.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, के.एस. भरत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, उमेश यादव.
Web Title: IPL 2023: Will Rohit Sharma and Virat Kohli Quit IPL Midway? The reason is coming up
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.