आयपीएलमध्ये आज होत असलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने-सामने आले आहेत. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर यशस्वी जयसवालने राजस्थानला तुफानी सुरुवात करून दिली आहे. खलील अहमदने टाकलेल्या पहिल्याच षटकात यशस्वीने विक्रमी २० धावा कुटून काढल्या.
दिल्लीने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूनवर खलील अहमदला खणखणीत चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर यशस्वीने डीप थर्डमॅनला चेंडू फटकावला. तिथे मुकेश कुमारने गफलत केल्याने चेंडू सीमापार गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार ठोकत यशस्वीने चौकारांची हॅटट्रिट केली. चौथा चेंडू निर्धाव गेला. मात्र पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार ठोकत यशस्वीने पहिल्याच षटकात एकूण २० धावा वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात जोस बटलरनेही तीन चौकार ठोकले. त्यामुळे पहिल्या दोन षटकांतच राजस्थानच्या धावफलकावर तब्बल ३२ धावा लागल्या.
याआधी पृथ्वी शॉ याने २०२१ मध्ये कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध खेळताना पहिल्याच षटकात सहा चेंडूत सहा चौकार ठोकले होते. तर आज यशस्वी जयस्वालने ६ चेंडूत ५ चौकार ठोकण्याची किमया साधली. चौथ्या चेंडूवर चौकार मारण्यात जयस्वाल यशस्वी झाला असता तर त्याला पृथ्वीच्या विक्रमाशी बरोबरी साधता आली असती.
तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने आज राजस्थानवर मात करून विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान दिल्ली कॅपिटल्ससमोर असणार आहे. आयपीएलमधील आकडेवारीचा विचार केल्यास दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध तुल्यबळ खेळ केलेला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ २६ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील १३ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तर १३ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या लढतीत कोण बाजी मारेल याबाबत उत्सुकता असेल.
Web Title: IPL 2023: Yashasvi Jaiswal's stormy start, makes a big record in the first over, scores 20 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.