Join us  

IPL 2023: घराच्या छतावर गिरवले क्रिकेटचे धडे, द्रविडची नजर पडताच बदललं नशीब, आता गाजवतोय आयपीएल

IPL 2023: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८ व्या सामन्यामध्ये लखनौ सुपरजायंट्सने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५७ धावा कुटून काढल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 9:38 AM

Open in App

आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८ व्या सामन्यामध्ये लखनौ सुपरजायंट्सने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५७ धावा कुटून काढल्या होत्या. ही आयपीएलमधील दुसरी सर्वात मोठी सांघिक धावसंख्या ठरली. दरम्यान, पंजाबच्या संघाला २०१ धावांत गुंडाळत लखनौने हा सामना ५६ धावांनी जिंकला होता. 

लखनौच्या विजयामध्ये फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या पहिल्या पाचपैकी ४ फलंदाजांनी ३० हून अधिक धावा जमवल्या. त्यात २३ वर्षीय युवा फलंदाज आयुष बदोनी यावे २४ चेंडूंमध्ये ४३ धावा कुटून काढल्या. आयुष बदोनीचा इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. त्याने याचवर्षी दिल्लीसाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच आपल्या तिसऱ्या सामन्यातच १९१ धावांची तुफानी खेळी खेळली होती. दरम्यान, गौतम गंभीरने त्याला लखनौ सुपरजायंट्स संघासी जोडले. आयुष हा फलंदाजीसोबतच ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो.

आय़ुषची क्रिकेटपटू बनण्याची सुरुवात ही घराच्या छतावरून झाली होती. त्याचे वडील विवेक बदोनी घराच्या छतावर ठरावीक ठिकाणी दगड ठेवायचे. त्यानंतर आयुषला गॅप शोधून फटके मारायला सांगायचे. असं दररोज चालायचं. हेच तंत्र आज त्याला क्रिकेटमध्ये उपयुक्त ठरत आहे. तो आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर चौफेर फटकेबाजी करत आहे. काल पंजाबविरुद्ध केलेल्या ४३ दावांच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार खेचले होते. 

आयुष बदोनीमधील गुणवत्ता राहुल द्रविडने २०१८ मध्ये ओळखली होती. तेव्हा आयुष १९ वर्षांखालील क्रिकेट खेळत होता. तर राहुल द्रविड हा या संघाचा प्रशिक्षक होता. त्याची तेव्हा भारतीय संघात निवड झाली, तसेच त्याला आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची निवड झाली नव्हती.

त्यानंतर दिल्लीकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी आयुषला खूप परिश्रम घ्यावे लागले होते. २०२० मध्येच त्याचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण झालं असतं. मात्र डीडीसीएच्या तत्कालीन क्रिकेट सल्लागार समितीचे चेअरमन अतुल वासन यांच्या शिफारशीनंतरही निवड समितीने त्याला संघात स्थान दिले नव्हते. एक वर्ष वाट पाहिल्यावर आयुष बदोनीला दिल्लीच्या टी-२० संघातून खेळण्याची संधी मिळाली. तिथेच गौतम गंभीरची नजर त्याच्यावर पडली आणि लखनौने २०२२ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सराहुल द्रविडगौतम गंभीर
Open in App