IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live : पहिल्या हाफमधील अपयश बाजूला ठेवून कोलकाता नाइट रायडर्स नवी सुरूवात करण्यासाठी सज्ज आहे. मागील सामन्यात त्यांनी विजय मिळवताना प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला काम राखले होते. आज त्यांचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाजने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. अफगाणिस्तानच्या या फलंदाजाने राष्ट्रीय संघातील सहकारी राशीद खानला बेक्कार चोपले. GT चा प्रमुख गोलंदाजाच्या ४ षटकांत ५४ धावा चोपल्या गेल्या. गुरबाजचे शतक हुकल्याने KKRच्या धावगतीला किंचितसा चाप बसला.
आज त्यांच्यासमोर गुजरात टायटन्सचे आव्हान आहे. १० गुणांसह गुजरात प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सामना ४५ मिनिटे उशीरा सुरु झाला. इडन गार्डनवर सुरु असलेल्या या सामन्यात KKR ला आधीच लिटन दासच्या माघारीमुळे धक्का बसला. एन जगदीशन व रहमनुल्लाह गुरबाज यांना अपेक्षित सुरुवात करता आली नाही. जगदीशन १९ धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. KKR ने अनपेक्षित डावपेच आखताना शार्दूल ठाकूरला वन डाऊन पाठवले, परंतु शमीने त्याला माघारी पाठवले. मोहित शर्माने अफलातून झेल घेताना शार्दूलला भोपळ्यावर बाद केले.
गुरबाजने अफगाणिस्तानचा सहकारी राशीद खान याला टार्गेट करताना खणखणीत फटके खेचले आणि २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. kkr ने १०षटकांत २ बाद ८२ धावा केल्या आणि ११व्या षटकात वेंकटेश अय्यर ( ११) धावांवर पायचीत झाला... कोलकाताने drs गमावला. नितीश राणा आज अपयशी ठरला. रिंकू सिंगने फॉर्म कायम राखताना गुरबाजला चांगली टक्कर दिली. दमदार फलंदाजी करणाऱ्या गुरबाजला अफगाणिस्तानचाच गोलंदाज नूर अहमदने बाद केले. गुरबाजने ३९ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावा केल्या. कोलकाताने ७ बाद १७९ धावा केल्या. आंद्रे रसेलने १९ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावा कुटल्या.