काल रात्री आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यामध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने २० षटकांमध्ये २५७ धावा कुटल्यानंतर पंजाबला २०१ धावांत रोखत सामना ५६ धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये लखनौने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून एकच फलंदाज जिद्दीने या आव्हानाला भिडला. त्याचं नाव आहे अथर्व तायडे.
लखनौने दिलेले २५८ धावांचे आव्हान पंजाबसाठी तसे अशक्यप्रायच होते. त्यातच कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग हे झटपट बाद झाल्याने पंजाबचा डाव आणखीच अडचणीत आला. मात्र याचवेळी मराठमोळ्या अथर्व तायडेने लखनौच्या गोलंदाजांवर तुफानी प्रतिहल्ला करत सामन्यात रंगत आणली. अथर्वने ८ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ६६ धावा कुटल्या.
आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणारा अथर्व तायडे हा मूळचा महाराष्ट्रातील आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो विदर्भच्या संघाकडून खेळतो. गतवर्षी लिवावामध्ये पंजाब किंग्सच्या संघाने त्याला केवळ २० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते. आयपीएलमधील त्याचा हा दुसरा हंगाम आहे. दरम्यान, ३६ चेंडूत ६६ धावांची तुफानी खेळी करून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
केवळ आयपीएलच नाही तर याआधी झालेल्या देशातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतही अथर्व तायडेने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ४९९ धावा काढल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवनला दुखापत झाल्याने अथर्व तायडेला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं आता सोनं केलं.