यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक सामन्यांत धावांचा पाऊस पडला आहे. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम यंदाच्या मोसमात दोनदा मोडला गेला सनरायझर्स हैदराबादने तर तीन सामन्यांत २६० हून अधिक धावा फटकावल्या आहेत. तसेच २८७ ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात आयपीएलमध्ये एका डावात ३०० धावांचा विक्रम नोंदवला जाईल का? असा प्रश्न कुतुहलानं विचारला जात आहे. दरम्यान, फलंदाजांचा उंचावलेला स्तर पाहता लवकरच आयपीएलमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडला जाईल, असं भाकित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने केलं आहे.
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात केवळ एकदाच ३०० हून अधिक धावा बनल्या आहेत. गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्ध ३ बाद ३१४ धावा जमवल्या होत्या. दरम्यान, कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी कार्तिकने सांगितलं की, मला वाटतं धावसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. जगभरातील टी-२० लीगच्या इतिहासात आयपीएलच्या पहिल्या ३२ सामन्यांमध्ये २५० अधिक धावा सर्वाधिक वेळा बनल्या आहेत. त्यावरून खेळाडू हे अधिक निडर आणि आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एका डावात ३०० धावांचा आकडा लवकरच कदाचित यंदाच्याच आयपीएलमध्ये पार झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही.
इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे संघांच्या फलंदाजीमध्ये सखोलता आली आहे. तसेच गोलंदाजांवर दबाव येऊ लागला आहे. अनेक युवा खेळाडू हे फटके खेळण्याच्या स्वातंत्र्यामुळे स्वच्छंद झाले आहेत आणि उत्तमोत्तम फटके खेळत आहेत, असे कार्तिकने सांगितले. तसेच भारतीय संघातून पुन्हा खेळण्याची आशा आपण सोडलेली नाही. तसेच टी-२० विश्वचषकासाठीच्या संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व काही करेन, असे कार्तिकने सांगितले.