मुंबई : हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाल्यानंतर गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे शुबमन गिल आता गुजरातचा नवीन कर्णधार असणार आहे. आयपीएलच्या मागील हंगामात गिलने स्फोटक खेळी करून सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला. गिलने आयपीएल २०२३ मधील १७ डावांत सर्वाधिक ८९० धावा कुटल्या अन् ऑरेंज कॅप पटकावली.
गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या हंगामातच विक्रम नोंदवला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.
दरम्यान, आपल्या घरच्या संघात पुनरागमन झाल्यानंतर हार्दिकने आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत पांड्याने आठवणींना उजाळा दिला. आयपीएल २०१५ च्या हंगामातून पांड्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली. मुंबईकडून खेळताना प्रसिद्धी मिळवलेल्या पांड्याने याच जोरावर पुढे भारतीय संघात जागा मिळवली. आपल्या आयपीएल प्रवासाचा दाखला देणारा व्हिडीओ हार्दिकने पोस्ट केला आहे, ज्यामध्ये १० लाख रूपयांपासून हार्दिकवर लागलेली बोली त्याने दर्शवली आहे. तसेच मुंबईच्या खेळाडूंसोबत घालवलेले क्षण, ड्रेसिंग रूममधील आठवणींचा दाखला त्याने दिला. खरं तर हार्दिकची मुंबईच्या संघात एन्ट्री झाल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाचे कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे.