नवी दिल्ली : आयपीएल २०२४चा लिलाव १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत दुबईत होऊ शकतो. त्याआधी महिला प्रीमियर लीगसाठी ९ डिसेंबर रोजी दिल्लीत लिलाव होणार आहे. पुरुष लीगचे आयोजन मात्र भारतातच होईल.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने फ्रॅन्चायजींना लिलावाच्या तारखा अद्याप कळविलेल्या नाहीत. पण, जाणकारांच्या मते, आयपीएल २०२४ चा लिलाव १८ आणि १९ डिसेंबरला दुबईत होईल. बोर्डाने मागच्या वर्षी आयपीएलचा लिलाव करण्यासाठी इस्तंबुल शहराची योजना आखली होती. पण, अखेर हा लिलाव कोच्ची येथे पार पडला. अशा वेळी दुबईत लिलावाचे आयोजन हीदेखील बोर्डाची अंतरिम योजना असू शकेल.
सर्व संघांना खेळाडू रिटेन आणि रिलिज करण्यास १५ नोव्हेंबर ही डेडलाइन देण्यात आली आहे. सध्या ‘ट्रेडिंग विंडो’ सुरू असून वनडे विश्वचषकानंतरच रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी पुढे येऊ शकेल.
डब्ल्यूपीएल फेब्रुवारीत?
भारतीय महिला क्रिकेट संघ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यात व्यस्त असल्यामुळे डब्ल्यूपीएल २०२४ चे आयोजन फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. त्यांचे सामने एकाच शहरात होतील की अन्य शहरांत, हे अद्याप स्पष्ट नाही.
आयपीएल संचालन समितीचे चेअरमन अरुण धुमल यांनी आधी स्पष्ट केल्यानुसार, आयपीएल २०२४ चे आयोजन पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर भारतात होईल. ‘लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आयपीएलचे वेळापत्रक निश्चित करणार आहोत. विविध राज्यांतील निवडणुकांच्या तारखा कळल्यानंतर सामने आयोजित होऊ शकतील,’ असे धुमल म्हणाले.