नवी दिल्ली : ‘बंगळुरू संघात जगभरातील दिग्गजांचा भरणा आहे. हे खेळाडू मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतात. दडपणात ते कामगिरी करीत नसल्यामुळे बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकविता आलेले नाही,’ असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले. मुंबई आणि चेन्नई या चॅम्पियन्स संघातून खेळलेल्या रायुडूने कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्याचा इशारा विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस यांच्याकडे होता.
रायुडू म्हणाला, ‘बंगळुरूचे गोलंदाज नेहमी धावांची खैरात करतात. फलंदाजही सांघिक कामगिरी करत नाही. दडपणात दमदार फलंदाजी करायला कोणीच उपलब्ध नसतो. युवा फलंदाज व सोबतीला दिनेश कार्तिक यांचा नेहमी संघर्ष सुरू असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिग्गज म्हणून वावरणाऱ्यांनी दडपणात कामगिरी करावी; पण ते सर्व जण ड्रेसिंग रूममध्ये असतात. १६ वर्षांनंतरही बंगळुरू संघाची कहाणी मात्र बदलली नाही. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास या संघाची अवस्था, ‘बाटली नवी, मद्य जुनेच,’ अशी आहे.’