IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : पंजाब किंग्सच्या सुरेख माऱ्यासमोर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड उभा राहिला. त्याच्या संयमी अर्धशतकाने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचले. इनिंग्ज संपायला १३ चेंडू शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला आणि चेपॉकचे स्टेडियम दणाणून गेले. पण, धोनीला आज अपेक्षित फटकेबाजी नाही करता आली आणि त्याच्याकडून नकळत सहकारी डॅरिल मिचेलचा अपमान झाल्याचा दावा केला गेला. समालोचन करणाऱ्या इरफान पठाणने धोनीच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
PBKS ने नाणेफेक जिंकून CSK ला प्रथम फलंदाजीला बोलावले आणि पंजाबच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. कागिसो रबाडा व सॅम कुरन यांनी पॉवर प्लेमध्ये चेन्नईवर दडपण टाकले होते. अर्शदीप सिंगची दोन षटकं वगळल्यास PBKS ची चांगली पकड दिसली. त्यानंतर हरप्रीत ब्रार ( २-१७) व राहुल चहर ( २-१६) यांनी फिरकीवर CSK ला जाळ्यात ओढले. ऋतुराज गायकवाडने खिंड लढवली आणि ४८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. आजच्या सामन्यातील महागडा गोलंदाज अर्शदीप ( १-५२) याने ऋतुराजची विकेट घेतली. अजिंक्य रहाणे ( २९), समीर रिझवी ( २१), मोईन अली ( १५) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांच्या हातभारामुळे चेन्नईने ७ बाद १६२ धावा केल्या.
नेमकं काय घडलं?अर्शदीप सिंगने २०वे षटक फेकले आणि तिसऱ्या चेंडूवर धोनीने लाँग ऑफच्या दिशेने फटका मारला. चेंडू पंजाबच्या खेळाडूच्या हातात जाईपर्यंत नॉन स्ट्रायकर डॅरिल मिचेल धाव घेण्यासाठी स्ट्राईक एंडवर पोहोचला होता. पण, धोनीने त्याला मागे जाण्यास सांगितले आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्याची ही कृती इरफान पठाणनला नाही आवडली आणि त्याने टीका केली. त्यानंतर धोनीने आणखी एक डॉट बॉल खेळला अन् नंतर षटकार खेचला. शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला.