IPL 2024 CSK vs DC: भारतीय संघाचा आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तेराव्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यात धोनी फलंदाजीला आला नाही. पण, दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात माहीने स्फोटक खेळी केली. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला रविवारी दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. परंतु, चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni Video) अखेरच्या काही षटकांमध्ये स्फोटक खेळी करत सामन्यात रंगत आणली. धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी त्याच्या खेळीने सर्वांची मनं जिंकली. (IPL 2024 News)
सामन्यानंतर धोनीने ग्राउंड स्टाफसोबत फोटो काढला. तसेच त्याने यावेळी काही चाहत्यांची भेट देखील घेतली. चेन्नईच्या फ्रँचायझीने धोनीचा एक भावनिक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 'चाहत्यांसाठी भेटवस्तू असल्याचे धोनी म्हणाला', अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे. सलग दोन सामने जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा विजयरथ दिल्ली कॅपिटल्सने रोखला. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीने २० धावांनी विजय मिळवत चेन्नईला पराभवाची धूळ चारली. खरं तर चेन्नईचा पराभव झाला असला तरी महेंद्रसिंग धोनीच्या स्फोटक खेळीने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आपल्या लाडक्या माहीची झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांना अखेर रविवारी धोनीची फलंदाजी पाहायला मिळाली.
दिल्ली कॅपिटल्स संघाने २० धावांनी CSK चा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला २० षटकांत ६ बाद केवळ १७१ धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. धोनीने ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १६ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या स्फोटक खेळीसाठी त्याला 'इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच' अवॉर्डने गौरवण्यात आले.