Rishabh Pant Fined : IPL 2024मध्ये रविवारी दोन सामने रंगले. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने हैदराबादच्या संघाला ७ गडी राखून पराभूत केले. तर दुसरीकडे चेन्नईच्या संघाला सलग दोन विजयानंतर पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघाने २० धावांनी CSKचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला २० षटकांत ६ बाद १७१ धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजयासमीप नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. रिषभ पंतच्या संघाला विजय मिळाला, पण त्यालाही एक मोठा धक्का बसला.
रिषभ पंतच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. पण असे असले तरी पंतला मोठा फटका बसला. रिषभ पंतला कर्णधार म्हणून तब्बल १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. सामना सुरु असताना षटकांची गती कमी राखल्याने दिल्ली संघाला हा फटका बसला आहे. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत गोलंदाजांचे नेतृत्व करण्यात काहीसा कमी पडला. सामन्याचा निर्धारित वेळ संपल्या नंतरही दिल्लीच्या संघाची ३ षटके टाकणे शिल्लक होते. त्यामुळे पंतवर ही कारवाई करण्यात आली.
यंदाच्या IPL मध्ये सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी कारवाई झालेला रिषभ पंत हा दुसरा कर्णधार आहे. याआधी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली. मंगळवारी चेन्नई विरूद्ध गुजरात यांच्यात रंगलेल्या सामन्यात शुबमन गिलला या कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्याला देखील कर्णधार म्हणून १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता.