आयपीएलमध्ये आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने तुफानी सुरुवात केली आहे. रचिन रवींद्रने सुरुवातीपासून गुजरातच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला अवघ्या ९.५ षटकांमध्येच शंभरीपार मजल मारून दिली.
आज चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या लढतीमध्ये गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर चेन्नईने धमाकेदार सुरुवात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चौकार-षटकारांची आतिषबाजी करत अवघ्या २७ चेंडूत चेन्रईचं अर्धशतक फलकावर लावले.
दरम्यान, गुजरातचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने जबरदस्त यष्टीरक्षाचं दर्शन घडवलं. रशिद खानने टाकलेल्या डावातील सहाव्या षटकात जबरदस्त फलंदाजी करत असलेला रचिन रवींद्र उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात चकला आणि वृद्धिमान साहाने चपळाईने यष्ट्या उद्ध्वस्त करत त्याला परतीचा रस्ता दाखवला. रवींद्रने २० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा कुटल्या. मात्र त्याचं अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकलं.
वींद्र बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने मोर्चा सांभाळला. त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाला शंभरीपार मजल मारून दिली.