आयपीएलमध्ये आज चेन्नई आणि गुजरात यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात गुजरातचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने जबरदस्त यष्टीरक्षाचं दर्शन घडवलं. रशिद खानने टाकलेल्या डावातील सहाव्या षटकात जबरदस्त फलंदाजी करत असलेला रचिन रवींद्र उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात चकला आणि वृद्धिमान साहाने चपळाईने यष्ट्या उद्ध्वस्त करत त्याला परतीचा रस्ता दाखवला.
आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या लढतीमध्ये गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर चेन्नईने धमाकेदार सुरुवात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चौकार-षटकारांची आतिषबाजी करत चेन्नईला अवघ्या २७ चेंडूत अर्धशतकी मजल मारून दिली. ही जोडी चेन्नईला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जात असतानाच रशिद खानच्या भन्नाट फिरकीवर वृद्धिमान साहाने चित्त्याच्या चपळाईने यष्ट्या उडवत रचिन रवींद्रला यष्टिचित केले. रवींद्रने २० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा कुटल्या. मात्र त्याचं अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकलं.
चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचे कर्णधार या हंगामात बदलले आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. तर यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने चेन्नईचं कर्णधारपद युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. आता दोन तरुण कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत असलेले आयपीएलमधील या दिग्गज संघांमध्ये बाजी कोण मारणार याबाबत उत्सुकता असेल.