Join us  

IPL 2024, CSK Vs GT: चेन्नईच्या झंझावातासमोर गुजरात गारद, ६३ धावांनी विजय मिळवत CSK गुणतालिकेत अव्वलस्थानी

IPL 2024, CSK Vs GT: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात करताना स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सवर ६३ धावांनी मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:30 PM

Open in App

गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात करताना स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सवर ६३ धावांनी मात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र आणि शिवम दुबे यांनी केलेल्या स्फोटक फलंदाजीनंतर दीपक चाहर, तुषार देशपांड आणि इतर गोलंदाजांनी भेदक मारा करत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला.  गतवर्षी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला गुजरातचा संघ घेईल का या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र चेन्नईने गुजरातला तशी कुठलीही संधी दिली नाही.  आज मिळवलेल्या विजयासह चेन्नई सुपरकिंग्सने गुणतक्त्यामध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे.  

चेन्नई सुपरकिंग्सने दिलेल्या २०७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी गुजरातला सावध सुरुवात करून दिली. मात्र डावातील तिसऱ्या षटकात शुभमन गिलला पायचीत करत दीपक चाहरने गुजरातला पहिला धक्का दिला. गिलला केवळ ८ धावाच जमवता आल्या.  त्यानंतर डावातील पाचव्या षटकात चांगली फलंदाजी करत असलेल्या वृद्धिमान साहाचा अडसर चाहरने दूर केला. त्याने साहाला तुषार देशपांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. साहाने १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने अप्रतिम झेल टिपून विजय शंकरला (१२) परतीचा रस्ता दाखवला. तेव्हा गुजरातची अवस्था ३ बाद ५५ अशी झाली होती. 

त्यानंतर साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने एक अप्रतिम झेल टिपत मिलरला (२१) माघारी धाडले. त्यानंतर साई सुदर्शन (३७), अझमतुल्लाह ओमरझाई (११), रशिद खान (१) आणि राहुल तेवटिया (६) हे पाठोपाठ बाद झाल्याने गुजरातचा पराभव निश्चित झाला. अखेरीस निर्धारित २० षटकांमध्ये गुजरातला ८ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली.  चेन्नईकडून दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिझूर रहमान यांनी प्रत्येकी दोन तर पतिराना आणि डेरेल मिचेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.

तत्पूर्वी सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीत शिवम दुबे याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचे डोंगर उभा केला. चेन्नई सुपरकिंग्सने २० षटकांत ६ बाद २०६ धावा फटकावल्या आणि गुजरातसमोर विजयासाठी २०७  धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईकडून रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी ४६  धावा काढल्या तर शिवम दुबेने २३ चेंडूत ५१ धावांची वादळी खेळी केली.  गुजरातकडून रशिद खान याने दोन तर मोहित शर्मा, साई किशोर आणि स्पेंसर यांना प्रत्येकी १ बळी टिपला. 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सऋतुराज गायकवाड