चेन्नई सुपरकिंग्सने दिलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ अडचणीत सापडला आहे. चेन्नईचा मध्यमगती गोलंदाज दीपक चाहरने गुजरातचा कर्णधार शुभमन गिल (८) आणि वृद्धिमान साहा (२१) यांना माघारी धाडत सामन्यामध्ये चेन्नईची स्थिती भक्कम केली. पाठोपाठ डेरेल मिचेलच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनीने विजय शंकरचा अप्रतिम झेल पकडत गुजरातचा डाव अडचणीत आणला.
२०७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि वृद्धिमान सहाने गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, वृद्धिमान साहाने काही चांगले फटकेही खेळले. मात्र डावातील तिसऱ्या षटकात शुभमन गिलला पायचीत करत दीपक चाहरने गुजरातला पहिला धक्का दिला. गिलला केवळ ८ धावाच जमवता आल्या. त्यानंतर डावातील पाचव्या षटकात चांगली फलंदाजी करत असलेल्या वृद्धिमान साहाचा अडसर चाहरने दूर केला. त्याने साहाला तुषार देशपांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. साहाने १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्यानंतर विजय शंकर १२ धावा काढून बाद झाल्याने गुजरातची अवस्था आणखीच बिकट झाली.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीत शिवम दुबे याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचे डोंगर उभा केला. चेन्नई सुपरकिंग्सने २० षटकांत ६ बाद २०६ धावा फटकावल्या आणि गुजरातसमोर विजयासाठी २०७ धावांचे आव्हान ठेवले होते.