IPL 2024, CSK vs RR Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील घरच्या मैदानावरील शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. Point Table मध्ये CSK १३ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत. पण हा सामना चाहत्यांना भावनिक करणारा होता, कारण MS Dhoni चा हा चेपॉकवरील कदाचित शेवटचा सामना ठरू शकतो. चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला नाही, तर हा त्यांचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना असेल, म्हणजेच धोनीला शेवटचं घरात खेळताना पाहण्याची ही शेवटची संधी ठरेल. सामन्याच्या आधी फ्रँचायझीने चाहत्यांना सामना संपला तरी जाऊ नका असे आवाहन केले होते.
चेपॉकवरील चेन्नईचा हा पन्नासावा विजय ठरला आणि एकाच स्टेडियमवर असा पराक्रम करणारा तो तिसरा संघ ठरला. या सामन्यानंतर चेन्नईच्या सर्व खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. धोनीच्या गळ्यात मेडल येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने सर्व स्टेडियमवर राऊंड मारला आणि चाहत्यांना टेनिस बॉल व टी शर्ट भेट म्हणून दिली. धोनी थोडा भावनिक झालेला दिसला आणि त्याला सुरेश रैना मिठी मारायला आला.
MS Dhoni ने आयपीएलमध्ये २६२ सामन्यांत ५२१८ धावा केल्या आहेत. IPL मध्ये त्याने ३६० चौकार व २५१ षटकार खेचले आहेत. यष्टींमागे धोनीने १५० झेल घेतले आहेत, तर ४२ स्टम्पिंग केले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ व २०२३ अशी पाच IPL जेतेपदं पटकावली आहेत. महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०००+ धावा करणारा एकमेव यष्टिरक्षक आहे. माहीने यष्टिंमागे सर्वाधिक १८४ बळी टीपले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक १३३ विजय हे त्याच्या नावावर आहेत. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक २५७ सामने खेळले आहेत आणि सर्वाधिक ११ फायनल्स खेळण्याचा पराक्रमही धोनीच्या नावावर आहे.