IPL 2024 DC vs CSK: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला रविवारी दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अखेरच्या काही षटकांमध्ये स्फोटक खेळी करत सामन्यात रंगत आणली. धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी त्याच्या खेळीने सर्वांची मनं जिंकली. ४२ वर्षीय माहीने अखेरच्या षटकात २० धावा कुटल्या. पण, धोनी लवकर फलंदाजीला आला असता तर चित्र काहीसे वेगळे असू शकले असते. यावर ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (IPL 2024 News)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने सांगितले की, जेव्हा महेंद्रसिंग धोनी आला तेव्हा सर्वांना वाटले चेन्नई नक्कीच सामना जिंकेल. मैदानावरील वातावरण, चाहत्यांमध्ये असलेला जल्लोष सर्वकाही सांगत होता. धोनीची एन्ट्री झाली अन् मैदानातील गोंगाट हे विलक्षण होते. तेव्हा मला जाणवले की, तो केवळ चाहत्यांसाठी फलंदाजीला आला नाही तर त्याची खेळी पाहून खूप छान वाटले. चेन्नईच्या संघाला धोनीची गरज भासणार यात शंका नाही. या संपूर्ण स्पर्धेत आणि कदाचित जेव्हा सीएसकेचा संघ दडपणाखाली असेल तेव्हा त्यांना धोनीची गरज असेल. क्लार्क 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होता.
धोनीची 'भारी' खेळी
स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, धोनीने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मला वाटते की, रवींद्र जडेजा दुसऱ्या टोकाला होता पण मधल्या फळीतील फलंदाज संघर्ष करताना दिसले. जडेजाला दिल्लीने चांगली गोलंदाजी करून शांत ठेवले पण, धोनी स्ट्राईकवर येताच त्याने पहिलाच चेंडू सीमारेषेकडे पाठवला. हे पाहून सर्वांनाच छान वाटले. मात्र, धोनीने मधल्या फळीत फलंदाजी करायला हवी असे चाहत्यांना देखील वाटते. धोनी ज्याप्रकारे फलंदाजी करतो हे पाहता मला वाटत नाही की तो पहिल्या पाच किंवा टॉप सिक्समध्ये फलंदाजी करताना दिसेल. तो कदाचित मी पाहिलेला सर्वोत्तम फिनिशर आहे. त्यामुळे मला वाटते की ते त्या भूमिकेत (फिनिशर) त्याचा चांगला वापर करतील.
सलग दोन सामने जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा विजयरथ दिल्ली कॅपिटल्सने रोखला. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील तेरावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीने २० धावांनी विजय मिळवत चेन्नईला पराभवाची धूळ चारली. खरं तर चेन्नईचा पराभव झाला असला तरी महेंद्रसिंग धोनीच्या स्फोटक खेळीने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आपल्या लाडक्या माहीची झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांना अखेर रविवारी धोनीची फलंदाजी पाहायला मिळाली.