IPL 2024 DC vs CSK: सलग दोन सामने जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा विजयरथ दिल्ली कॅपिटल्सने रोखला. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील तेरावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीने २० धावांनी विजय मिळवत चेन्नईला पराभवाची धूळ चारली. खरं तर चेन्नईचा पराभव झाला असला तरी महेंद्रसिंग धोनीच्या स्फोटक खेळीने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आपल्या लाडक्या माहीची झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांना अखेर रविवारी धोनीची फलंदाजी पाहायला मिळाली. (IPL 2024 News)
दिल्ली कॅपिटल्स संघाने २० धावांनी CSK चा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला २० षटकांत ६ बाद केवळ १७१ धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. अखेर रिषभ पंतच्या संघाला विजय मिळाला, पण धोनीने केलेल्या स्फोटक खेळीने त्याने चाहत्यांसह पत्नी साक्षीचे मन जिंकले.
धोनीने ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १६ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या स्फोटक खेळीसाठी त्याला 'इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच' अवॉर्डने गौरवण्यात आले. याचाच दाखला देत धोनीची पत्नी साक्षी धोनीने भारी प्रतिक्रिया दिली. साक्षी धोनीने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत धोनीचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो ठेवला. तसेच तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, हाय धोनी, मला सामना गमावल्यासारखं वाटलं देखील नाही. एकूणच धोनीला पुरस्कार मिळाल्याने साक्षीने आनंद व्यक्त केला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सांघिक कामगिरी करत पहिला विजय मिळवला.
Web Title: ipl 2024 dc vs csk MS Dhoni's wife Sakshi Dhoni reacts after Chennai Super Kings lost their match against Delhi Capitals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.