IPL 2024 DC vs GT सामन्यात कर्णधार रिषभ पंतच्या (८८*) तुफानी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेगुजरात टायटन्सला ४ धावांनी पराभूत केले. दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पंतचे नाबाद अर्धशतक, अक्षर पटेलच्या ६६ धावा आणि ट्रिस्टन स्टब्सच्या झंझावाती २६ धावांच्या जोरावर २२४ धावांपर्यंत मजल मारली. २२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना साई सुदर्शन (६५) आणि डेव्हिड मिलर (५५) यांनी चांगली झुंज दिली. राशिद खानने देखील शेवटच्या टप्प्यात फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण क्षेत्ररक्षणात ट्रिस्टन स्टब्सने अफलातून कामगिरी करत सामन्याचा निकाल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गुजरातच्या संघाला १२ चेंडूत ३६ धावांची गरज असताना रसिख सलाम गोलंदाजीला आला. त्याच्या गोलंदाजीवर रशिद खानने पहिला चेंडू चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर राशिद खानने षटकार खेचायचा प्रयत्न केला. चेंडू षटकार जाणारच होता पण ट्रिस्टन स्टब्स वाऱ्याच्या वेगाने आला, चेंडू हवेत असताना त्याने उंच झेप घेतली आणि चेंडू अडवला. त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेच्या बाहेर जाणार होता. पण त्यावेळी त्याने पटकन चेंडू मैदानात टाकला आणि संघासाठी ५ धावा वाचवल्या. त्याचा हाच प्रयत्न सामना जिंकताना उपयोगी पडला आणि दिल्लीच्या संघाने अखेर ४ धावांनी सामना जिंकला. पाहा ट्रिस्टन स्टब्सने अडवलेला चेंडू-
दरम्यान, सामन्यात दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात २२४ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली नव्हती. पण अक्षर पटेलला फलंदाजीत बढती दिली गेली. त्याच्यासोबत रिषभ पंतने चांगली भागीदारी केली. पंतने ४३ चेंडूत नाबाद ८८ तर अक्षर पटेलने ४३ चेंडूत ६६ धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात ट्रिस्टन स्टब्सने ७ चेंडूत नाबाद २६ धावा ठोकत संघाला २२४ पर्यंत मजल मारून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिल स्वस्तात बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन (६५) आणि वृद्धिमान साहा (३९) यांनी फटकेबाजी करत सामना रंगतदार केला. नंतर डेव्हिड मिलरने अनुभवाचा नमुना सादर करत २३ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. शेवटच्या टप्प्यात रशिद खानने देखील अप्रितम झुंज दिली. त्याने ११ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. पण अखेरीस दिल्लीने ४ धावांनी सामना जिंकला.