Join us  

पंतला भारतीय संघासाठी खेळताना पाहायचे आहे; ऑस्ट्रेलियन दिग्गजानं व्यक्त केली इच्छा

IPL 2024 DC vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा विजयरथ कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:20 PM

Open in App

Rishabh Pant IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सला नमवून केकेआरच्या संघाने सलग तिसरा विजय मिळवला. दिल्लीने सामना गमावला असला तरी त्यांचा कर्णधार रिषभ पंतच्या खेळीने सर्वांची मनं जिंंकली. त्याच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जीवघेण्या अपघातातून परतल्यानंतर त्याने लय पकडल्याचे दिसते. पंतच्या खेळीचा दाखला देत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकेल क्लार्कने एक मोठे विधान केले आहे. 

क्लार्क म्हणाला की, पंतने केकेआरविरूद्ध केलेली स्फोटक खेळी त्याच्यासह भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर आहे. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर मैदानात परतून पंतने केलेली खेळी ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे. त्याने कठोर परिश्रम घेऊन इथपर्यंत मजल मारली. एक कर्णधार म्हणून त्याची खेळी पाहून खूप आनंद वाटला. तो मैदानात थकलेल्या अवस्थेत दिसला. मग संघाचे फिजिओ त्याला तपासण्यासाठी दोन वेळा मैदानात धावत आले. त्यामुळे आशा आहे की तो ठीक आहे. तो एक अद्भुत खेळाडू आहे आणि तो मैदानात परत आल्याने सर्वांना आनंद झाला असून आम्हाला त्याला भारतासाठी खेळताना पाहायचे आहे. तो लवकरच भारतीय संघातून खेळेल अशी आशा असून मला त्याला भारतासाठी खेळताना पाहायचे आहे. (Rishabh Pant News) 

मायकेल क्लार्क आणखी म्हणाला की, केकेआरची फलंदाजी इतकी खोल आहे की, ते सलामीवीर सुनील नरेनसोबत कधीही जोखीम घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचा हा एक उत्तम निर्णय आहे. मला वाटते की तो ज्या प्रकारे खेळतो तो जास्तीत जास्त जोखीम पत्करतो. संपूर्ण आयपीएलमध्ये नरेन हा एक सलामीवीर म्हणून खेळेल यात शंका नाही. यामुळे संघाला आणखीच फायदा होईल. क्लार्क 'स्टार स्पोर्ट्स'वर सामन्याचे विश्लेषण करताना बोलत होता. 

केकेआरचा विजयरथ कायम आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा विजयरथ कायम आहे. त्यांनी बुधवारी दिल्ली कॅपिटल्सला नमवून विजयाची हॅटट्रिक लगावली. केकेआर आताच्या घडीला ६ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीला घाम फुटला. २७३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. दिल्लीने १७.२ षटकांत सर्वबाद केवळ १६६ धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने एकतर्फी झुंज दिली. त्याने ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत ५५ धावा केल्या. 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्स