IPL 2024, DC vs LSG Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील अखेरच्या साखळी सामन्यांत विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या या विजयाने DC ने स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले, परंतु त्याचवेळी त्यांनी राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. RR १२ सामन्यांत १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि DC ने विजय मिळवल्याने LSG लाही १६ गुणांपर्यंत जाण्यापासून रोखले. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स हे दोनच संघ जे १६ गुणांपर्यंत पोहोचणारे संघ राहिले आहेत.
इशांत शर्माने पाचव्या चेंडूवर स्लोवरवन वर लोकेश राहुलला ( ५) चकवले आणि मुकेश कुमारने अप्रतिम परतीचा झेल टिपला. तिसऱ्या षटकात इशांतच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकचा झेल खलीलने टाकला. पण, पुन्हा एकदा इशांच्या गोलंदाजीवर मुकेशने झेल टिपला आणि क्विंटनला १२ धावांवर बाद केले. LSG ची पडझड सुरू राहिली आणि अक्षर पटेलने चौथ्या षटकात मार्कस स्टॉयनिसला ( ५) यष्टिचीत केले. पण, निकोलस पूरनने पुढील चेंडूंवर ४,६,४,६ असे फटके खेचून LSG वरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. इशांत थांबायचं नाव घेत नव्हता आणि पुढच्या षटकात त्याने दीपक हुडाला पायचीत करून DC ला चौथे यश मिळवून दिले.
तत्पूर्वी, LSG ला स्फोटक जॅक फ्रेझर मॅकगर्कला ( ०) शांत ठेवण्यात यश आले असले तरी अभिषेक पोरेल व शे होप यांच्या फटकेबाजीने संघाला मजबूत स्थितीत आणले. दोघांनी ९२ धावांची भागीदारी केली. LSG च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत DC च्या धावगतीवर वेसण घातले होते. पण, रिषभ पंत व त्रिस्तान स्तब्स यांनी शेवटच्या षटकांत फटकेबाजी करून DC ला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवले. होपने ३८ धावा केल्या, तर अभिषेकने ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावा चोपल्या. रिषभच्या ३३ आणि अक्षर पटेलच्या १४ धावांच्या योगदानांनी संघाला मजबूती दिली. त्रिस्तान स्तब्सने २५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५७ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीने ४ बाद २०८ धावा केल्या.