Delhi Capitals Replacement Gulbadin Naib: दिल्ली कॅपिटल्सचा यंदाचा हंगाम संमिश्र स्वरूपाचा सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांपैकी दिल्लीने ४ सामन्यांत विजय मिळवून ८ गुण कमावले आहेत. दिल्लीसाठी आनंदाची बाब म्हणजे, गेल्या ५ पैकी ३ सामने दिल्लीने जिंकले आहेत. असे असताना दिल्लीला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. हॅमस्ट्रींग दुखापतीच्या उपचारासाठी DC चा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) हा ऑस्ट्रेलियात गेला होता. त्याने भारतात न परतण्याचा निर्णय घेत उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या जागी आता दिल्लीला एक दमदार खेळाडू मिळाला आहे. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नईबला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल करून घेण्यात आले आहे. गुलबदिन याआधी कधीही IPL खेळलेला नाही त्यामुळे त्याचा हा पहिलाच हंगाम असणार आहे.
अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये १ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या आगामी T20 World Cup 2024 आधी पूर्णपणे तंदुरूस्त होण्याच्या उद्देशाने मिचेल मार्श याने IPLकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा गुलबदिन नईब याला मिचेल मार्शची रिप्लेसमेंट म्हणून संघात करारबद्ध करण्यात आले आहे. गुलबदिन हा IPLमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे. गुलबदिनला ५० लाखांच्या मूळ किमतीसह दिल्ली संघाने करारबद्ध केले आहे.
मिचेल मार्शने दिल्ली संघाकडून यंदाच्या हंगामात केवळ ४ सामने खेळला. त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. मिचेल मार्श ३ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शेवटचा खेळला होता आणि त्यानंतर तो मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. वर्ल्ड कप स्पर्धेत मार्शकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे दुखापत झाल्यावर तो लगेच मायदेशात परतला. MI विरुद्धच्या सामन्यापूर्वी तो भारतात परतणे अपेक्षित होते. पण त्याने माघार घेतली. त्याने दिल्लीकडून ४ सामन्यांत ६१ धावा केल्या आणि फक्त १ विकेट घेतली.
याआधी लुंगी एनगिडीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आणि हॅरी ब्रूकनेही वैयक्तिक कारणास्तव आयपीएल खेळणे टाळले. डेव्हिड वॉर्नर व इशांत शर्मा यांनाही दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे दिल्लीच्या मागची दुखापतग्रस्तांची मालिका संपत नसतानाच, बदली खेळाडूमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.