IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi - दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघात आज दोन बदल पाहायला मिळाले. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी संघात पृथ्वी शॉ व इशांत शर्मा यांचे पुनरागमन झाले. आयपीएलचा सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येत आहे आणि दिल्ली कॅपिटल्सचे हे घरचे मैदान आहे. पण, महेंद्रसिंग धोनीचा करिष्मा येथे एवढा दिसला की स्टेडियम CSKच्या पिवळ्या जर्सीने गच्च भरले होते. चेंडू खेळपट्टीवर चांगला स्वींग होताना दिसला आणि त्यामुळे पृथ्वी व डेव्हिड वॉर्नर हे चाचपडताना दिसले. मात्र, सेट झाल्यावर वॉर्नरने हात मोकळा केला अन् दीपक चहरचा चेंडू स्टँडमध्ये पाठवला.
२०१९ मध्ये विशाखापट्टणम येथे आयपीएलचा सामना झाला होता आणि तोही DC vs CSK असाच... दुसऱ्या क्वालिफायर लढतीत चेन्नईने ६ विकेट्सने बाजी मारली होती. चहरच्या तिसऱ्या षटकात वॉर्नरने २,६,४,४,१ अशी फटकेबाजी केली. चहरच्या पहिल्या ३ षटकांत DC च्या सलामीच्या जोडीने ३४ धावा कुटल्या. तेच तुषार देशपांडेने २ षटकांत ८ धावा दिल्या. दिल्ली कॅपिटल्सने ५.२ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. मुस्ताफिजूर रहमानच्या पहिल्या षटकात पृथ्वीने ४,४,४ असे फटके खेचल्याने दिल्लीच्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६२ धावा उभ्या राहिल्या. पृथ्वीने खणखणीत षटकाराने रवींद्र जडेजाचे स्वागत केले. त्यानंतर वॉर्नरनेही हात मोकळे केले.
वॉर्नरने ( ६५१०*) आज आयपीएल इतिहासात ६५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये नाव नोंदवले. विराट कोहली ( ७४४४) व शिखर धवन ( ६७५४) यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. वॉर्नरने ३२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे ट्वेंटी-२०तील ११०वे अर्धशतक ठऱले आणि त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. चेन्नईविरुद्ध आयपीएलमध्ये ५०० हून अधिक चेंडूंचा सामना करणारा तो पहिला परदेशी व विराट, रोहित व धवननंतर चौथा फलंदाज ठरला.
Web Title: IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates - Fifty by David Warner, he reaches the 6500-run mark in the IPL, equal chris gayle most fifty records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.