IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi - पृथ्वी शॉ याने संधीचे सोनं करताना आज डेव्हिड वॉर्नरसहचेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. स्वींग होणाऱ्या खेळपट्टीवर या दोघांनी पहिली ४ षटकं संयम दाखवला अन् नंतर प्रहार सुरू केला. वॉर्नरने अर्धशतक पूर्ण करून अनेक विक्रम तोडले. मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा त्याचा प्रयत्न फसला अन् मथिशा पथिरानाने ( MATHEESHA PATHIRANA) अविश्वसनीय झेल घेऊन दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला. पथिरानाचा झेल पाहून महेंद्रसिंग धोनीही अवाक् झाला.
डेव्हिड वॉर्नरने CSKच्या गोलंदाजांना बेक्कार चोपला; IPL इतिहासात मोठा पराक्रम नोंदवला
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी व वॉर्नर यांनी चांगली सलामी दिली. दीपक चहरच्या तिसऱ्या षटकात वॉर्नरने २,६,४,४,१ अशी फटकेबाजी केली. चहरच्या पहिल्या ३ षटकांत DC च्या सलामीच्या जोडीने ३४ धावा कुटल्या. मुस्ताफिजूर रहमानच्या पहिल्या षटकात पृथ्वीने ४,४,४ असे फटके खेचल्याने दिल्लीच्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६२ धावा उभ्या राहिल्या. पृथ्वीने खणखणीत षटकाराने रवींद्र जडेजाचे स्वागत केले. त्यानंतर वॉर्नरनेही हात मोकळे केले. वॉर्नरने ३२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
१०व्या षटकात रहमानच्या गोलंदाजीवर वॉर्नरने रिव्हर्स स्वीप मारला, परंतु पथिरानाने हवेत झेपावत अप्रतिम झेल टिपला. वॉर्नर ३५ चेंडूंत ५ चौकार ३ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला अन् पृथ्वीसह ९३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ११व्या षटकात पृथ्वीने षटकाराने जडेजाचे स्वागत केले, परंतु चौथ्या चेंडूवर त्याची विकेट पडली. पृथ्वी २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर धोनीच्या हाती झेल देऊन परतला.