IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi - दिल्ली कॅपिटल्सनेआयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सवर शानदार विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत व पृथ्वी शॉ यांच्या फटकेबाजीच्या जोरावर DC ने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर मुकेश कुमार, खलील अहमद या वेगवान गोलंदाजांनी CSK चे कंबरडे मोडले. पण, विशाखापट्टणमवर MS Dhoniची मोहीनी पाहायला मिळाली. त्यामुळे मॅच जरी दिल्लीने जिंकली असली तरी मनं ही धोनीच्या CSK च्या बाजूने होती.
पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आक्रमक सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव मधल्या षटकांत गडगडला होता. पण, रिषभ पंतने वेगवान अर्धशतक झळकावून चेन्नई सुपर किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे केले. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्व कौशल्याने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली. गोलंदाजीत सातत्याने बदल करून त्याने दिल्लीची सामन्यावरील पकड सैल केली होती. मथिशा पथिरानाने अविश्वसनीय झेल सोबतच ३ विकेट्स घेतल्या. पृथ्वीने २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. वॉर्नर ३५ चेंडूंत ५ चौकार ३ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला. पथिरानाने त्यानंतर मिचेल मार्श ( १८) व त्रिस्तान स्तब्स ( ०) यांचे त्रिफळे उडवले. पण, रिषभ उभा राहिला आणि त्याने ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. पथिरानाने ४-०-३१-३ अशी स्पेल टाकली.
दिल्लीने ५ बाद १९१ धावा केल्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड ( १) पहिल्याच षटकात खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ खलीलने पुढच्या षटकात राचिन रवींद्रला ( २) माघारी पाठवले. यंदाच्या आयपीएलमध्ये निर्धाव षटक फेकण्याचा पहिला मान खलीलने पटकावला. अजिंक्य रहाणे व डॅरील मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना CSK ची पडझड रोखली. पण, दिल्लीच्या जलदगती गोलंदाजांचा मारा अप्रतिम राहिला आणि त्यामुळे चेन्नईला १० षटकांत २ बाद ७५ धावा करता आल्या. त्यांना शेवटच्या ६० चेंडूंत ११७ धावा करायच्या होत्या. ११व्या षटकात ६५ धावांची ही भागीदारी तुटली आणि मिचेल ( ३४ ) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला.
पथिरानाच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून शिवम दुबेला मैदानावर उतरवले. पण, मुकेश कुमारने १४व्या षटकात अजिंक्यला ( ४५ ) झेलबाद केले. त्याने ५ चौकार व २ षटकार खेचले. मुकेशने पुढच्याच चेंडूवर समीर रिझवीला गोल्डन डकवर माघारी पाठवून CSK च्या अडचणी वाढवल्या. त्यांना ३० चेंडूंत विजयासाठी ७९ धावांची गरज होती. दिल्लीच्या गोलंदाजांचा अचूक मारा चेन्नईच्या अडचणी आणखी वाढवत होता. मुकेशच्या पुढच्या षटकात शिवम दुबे ( १८) माघारी परतला अन् MS Dhoni मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, परंतु पुढच्या चेंडूवर खलीलने त्याचा सोपा झेल सोडला.
महेंद्रसिंग धोनीचं दडपण खलीलनं एवढं घेतलं की १८व्या षटकात ३ वाईड चेंडू फेकले. त्याने १२ धावा दिल्याने CSK ला शेवटच्या २ षटकांत ४६ धावा करायच्या होत्या. मुकेशने १९व्या षटकात टिच्चून मारा करताना केवळ ५ धावा देऊन चेन्नईचा पराभव निश्चित केला. ६ चेंडूंत ४१ धावांची गरज असताना धोनीने शेवटच्या षटकांत दोन चौकार व २ षटकार खेचले, परंतु चेन्नईला ६ बाद १७१ धावा करता आल्या. धोनी १६ चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला.
Web Title: IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates - MS Dhoni craze in Vizag, DC beat CSK by 20 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.