IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi - दिल्ली कॅपिटल्सने ज्या प्रकारे सुरूवात केली, ते पाहता ते सहज दोनशे पार जातील असे वाटले होते. पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावा चोपल्या होत्या. पण, मथिशा पथिरानाच्या अविश्वसनीय झेलने चेन्नई सुपर किंग्सला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने २ चेंडूंत भन्नाट यॉर्करवर दिल्ली कॅपिटल्सच्या दोन फलंदाजाचे त्रिफळे उडवून CSK ला फ्रंटसीटवर बसवले.
पृथ्वी शॉ याने मिळालेल्या संधीचे सोनं करताना आज डेव्हिड वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. या दोघांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. १०व्या षटकात रहमानच्या गोलंदाजीवर वॉर्नरने रिव्हर्स स्वीप मारला, परंतु पथिरानाने हवेत झेपावत अप्रतिम झेल टिपला. वॉर्नर ३५ चेंडूंत ५ चौकार ३ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला अन् पृथ्वीसह ९३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ११व्या षटकात पृथ्वीने षटकाराने जडेजाचे स्वागत केले, परंतु चौथ्या चेंडूवर त्याची विकेट पडली. पृथ्वी २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर धोनीच्या हाती झेल देऊन परतला.
रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि मिचेल मार्श त्याच्या सोबतीला उभा राहिला. मात्र, पथिराना अप्रतिम चेंडूवर मार्शचा ( १८) त्रिफळा उडवला आणि त्यानंतर त्रिस्तान स्तब्सचाही ( ०) त्रिफळा उडवून पथिरानाने DC चा खेळ खल्लास केला. दोन स्फोटक फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीची सामन्यावरील पकड निसटली आणि आता रिषभ पंतवर सर्व मदार राहिली. दिल्लीने १५ षटकांत ४ बाद १३४ धावा केल्या होत्या.