IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्सचा नाद खुळा खेळ पाहायला मिळाला. सुनील नरीन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग यांनी मिळून १८ षटकार व २२ चौकारांची आतषबाजी करून दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. स्टेडियमचा एकही कोपरा असा नव्हता जिथे या फलंदाजांनी चेंडू पोहोचवला नसेल. KKR ने आज त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केलीच, शिवाय आजच्या त्यांच्या ७ बाद २७२ धावा या आयपीएलमधील दुसऱ्या सर्वोत्तम धावसंख्या ठरल्या. काही दिवसांपूर्वी सनरायझर्स हैदराबादने २७७ धावा ( वि. मुंबई इंडियन्स ) चोपल्या होत्या.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या२७७/३ - SRH v MI, 2024२७२/७ - KKR v DC, 2024*२६३/५ - RCB v PWI, 2013 २५७/५ - LSG v PBKS, 2023२४८/३ - RCB v GL, 2016
आज कोलकाताचे फलंदाज चौकार-षटकारांचीच भाषा बोलत होते आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यालाही क्षेत्ररक्षण नेमकं कसं लावावं हेच सुचत नव्हते. सुनील नरीनने ७ चौकार व ७ षटकारांसह ३९ चेंडूंत ८५ धावांची वादळी खेळी केली. त्याला १८ वर्षांच्या अंगक्रिश रघुवंशीची दमदार साथ मिळाली. दोघांनी ४८ चेंडूंत १०४ धावांची भागीदारी केली. अंगक्रिश २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा करून माघारी परतला. आंद्रे रसेलने षटकाराची परंपरा कायम राखताना १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. रसेल व श्रेयस अय्यर ( १८) यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रिंकू सिंगने ८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या.
रिषभ पंतने २०व्या षटकात संघातील अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला गोलंदाजीला आणले. इशांतच्या २ षटकांत ३४ धावा चोपल्या गेल्या होत्या, परंतु त्याने २०व्या षटकात पहिल्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून रसेलचा त्रिफळा उडवला. बाद झाल्यानंतर रसेलने या चेंडूचे कौतुक केले.