IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्या आज उभ्या केल्या. सुनील नरीनच्या ( Sunil Narine ) स्फोटक सुरूवातीला १८ वर्षांच्या अंगकृष रघुवंशीची दमदार साथ मिळाली. दोघांनी ४८ चेंडूंत १०४ धावांची वादळी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सची कंबर मोडली. Angkrish Raghuvanshi ने आज शाहरुख खान व गौतम गंभीरचीही शाबासकी मिळवली. आंद्रे रसेलने शेवटच्या षटकांत कॅरेबियन तडका देताना कोलकाता नाईट रायडर्ससाठी मोठी धावसंख्या उभारून दिली.
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि नरीनने तो सार्थ ठरवला. त्याने इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. फिल सॉल्ट नॉन स्ट्राईक एंडवरून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहत होता. एनरिच नॉर्खियाच्या पाचव्या षटकात सॉल्ट १८ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला ६० धावांवर पहिला धक्का बसला. पण, नरीनचे वादळ काही थांबायचं नाव घेत नव्हते. त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पॉवर प्लेमध्ये KKR ने १ बाद ८८ धावा कुटल्या. यष्टींमागून रिषभ सीमापार जाणारे चेंडू पाहत राहिला.
१८वर्षीय अंगकृष रघुवंशीनेही मनगटाचा सुरेख वापर करून खणखणीत षटकार खेचायला सुरुवात केले. नरीनचा झंझावात १३व्या षटकात थांबवण्यात मिचेल मार्शला यश आले त्याने ७ चौकार व ७ षटकारांसह ३९ चेंडूंत ८५ धावांची खेळी केली. अंगकृषसह त्याने ४८ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. अंगकृषने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि KKR कडून अनकॅप्ड खेळाडूने झळकावलेले हे वेगवान अर्धशतक ठरले. तो २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा करून माघारी परतला. आंद्रे रसेलने षटकाराची परंपरा कायम राखताना १६ षटकांत संघाला २०५ पर्यंत पोहोचवले. शेवटच्या ४ षटकांत आतषबाजी करून KKR ला सनरायझर्स हैदराबादचा २७७ धावांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती.