IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : मुंबई इंडियन्सला सहावा पराभव पत्करावा लागला आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. उर्वरित ५ सामन्यांत विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफमध्ये कदाचित प्रवेश मिळू शकतो. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांना १० धावांनी पराभव पत्करावा लागला. DC च्या २५७ धावांचा पाठलाग करताना MI ला ९ बाद २४७ धावा करता आल्या. या पराभवानंतर MI चा सलामीवीर इशान किशन ( Ishan Kishan ) याच्यावर कारवाई केली गेली.
जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. त्याने अभिषेक पोरेलसह ( ३६) ११४ धावा फलकावर चढवल्या. शे होप ( ४१), रिषभ पंत ( २९) त्रिस्तान स्तब्स ( ४८) यांनी संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले. प्रत्युत्तरात इशान किशन ( २०), रोहित शर्मा ( ८), सूर्यकुमार यादव ( २६) कमी धावांवर माघारी परतले. हार्दिक पांड्या ( ४६) व तिलक वर्मा यांनी ३९ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रसिख सलामने ३ धक्के देताना मॅच फिरवली. टीम डेव्हिड ( ३७) व तिलक ( ६३) यांनी झुंज अपयशी ठरली.
दरम्यान, IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल इशान किशनला फटकारले गेले आणि त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. इशानला ९ सामन्यांत २१२ धावा करता आल्या आहेत आणि त्याचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणे अशक्य वाटत आहे.