Join us  

जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 

दिल्लीने २०११ मध्ये पंजाबविरुद्ध ४ बाद २३१ धावा केल्या होत्या आणि ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होती. पण, हा विक्रम मोडला गेला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 5:16 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live :  Jake Fraser-McGurk हे नाव आता मुंबई इंडियन्स चाहत्यांच्या डोक्यात नक्की गेलं असेल... २२ वर्षाचा पोरगा जगातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही जुमानत नाही, म्हणजे काय... जॅक फ्रेधर-मॅकगर्कने पॉवर प्लेमध्ये ७८ धावा चोपल्या आणि दिल्लीकडून पहिल्या सहा षटकात एखाद्या खेळाडूने चोपलेल्या सर्वाधिक होत्या. तो आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला, परंतु ८४ धावांवर त्याची विकेट पडली. पण, त्याने सेट केलेला खेळ दिल्ली कॅपिटल्सच्या इतर फलंदाजांनी पुढेही सुरू ठेवला अन् MI समोर तगडे लक्ष्य उभे केले. दिल्लीने २०११ मध्ये पंजाबविरुद्ध ४ बाद २३१ धावा केल्या होत्या आणि ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होती. पण, हा विक्रम मोडला गेला. 

मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला

MI ने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताच DC च्या ताफ्यात आनंद व्यक्त केला गेला. तो आनंद का होता, हे  २२ वर्षीय जॅक फ्रेझर मॅकगर्कने फटकेबाजीने दाखवून दिले. त्याने पहिल्या षटकापासून तुफान फटकेबाजी सुरू केली. जसप्रीत बुमराहसारख्या घातक गोलंदाजाचेही त्याने स्वागत षटकाराने केले आणि त्या षटकात १८ धावा चोपून MI गोलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला.  यंदाच्या पर्वातील मुंबईच्या गोलंदाजाचे हे महागडे षटक ठरले. अभिषेक पोरेलसह त्याने २.४ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. फ्रेझरने १५ चेंडूंत अर्धशतक केल्या आणि यंदाच्या पर्वातील हे वेगवान अर्धशतक ठरले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीने ९२ धावा उभ्या केल्या आणि त्यात फ्रेझरच्या ७८ धावा होत्या.   फ्रेझरला रोखण्यासाठी कर्णधार हार्दिक पांड्या स्वतः आला, परंतु त्यालाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाने नाही सोडले. अखेर अनुभवी गोलंदाज पियुष चावलाने चतुराईने गोलंदाजी करून मुंबईला विकेट मिळवून दिली. तो २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावांवर मोहम्मद नबीच्या हाती झेलबाद झाला आणि दिल्लील ७.३ षटकांत ११४ धावांवर पहिला धक्का बसला. फ्रेझरने सेट केलेला धावांचा वेग कायम राखण्यासाठी शे होपला पुढे पाठवले, परंतु त्याच्या संथ खेळीने अभिषेकवरील दडपण वाढवले. नबीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक (३६) स्टम्पिंग झाला. Rishabh Pant फलंदाजीला येताच होपने हात मोकळे केले आणि त्याने ३ खणखणीत सिक्स मारले. होप व पंत यांनी २२ चेंडूंत ५१ धावा जोडल्या आणि त्यात होपच्या ३५ ( १० चेंडू) धावांचे योगदान राहिले. ल्यूक वूडच्या चेंडूवर मोठा फटका मारताना होप बाद झाला. त्याने १७ चेंडूंत ५ षटकारांसह ४१ धावा केल्या. DC ने १५ षटकांत १९० धावा फलकावर चढवल्या. वूडने टाकलेल्या १८व्या षटकात त्रिस्तान स्तब्सने यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून ४,४,६,४ असे फटके खेचले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला दोन चौकार खेचले. त्या षटकात २६ धावा आल्या. दिल्लीने २३४ धावांचा टप्पा ओलांडला आणि ही त्यांची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. रिषभ ( २९) बुमराहच्या स्लोव्हर बाऊन्सवर रोहितच्या हाती झेल देऊन माघारी परतला. स्तब्सने २५ चेंडूंत ४८ धावा करून संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले.

 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स