नवी दिल्ली - दिल्लीविरुद्ध रविवारी आठव्या स्थानावर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याला वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी यायला हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मायकेल क्लार्कच्या मते मात्र धोनी संघाची गरज लक्षात घेऊनच असा बदल करू शकतो. धोनीने काल १६ चेंडूंत नाबाद ३७ धावांचा झंझावात केला, मात्र त्याचा संघ २० धावांनी पराभूत झाला. त्यानंतर चाहत्यांनी त्याला वरच्या स्थानावर फलंदाजी करण्याची गळ घातली.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार क्लार्क म्हणाला, ‘धोनी आधीसारखाच फिनिशरची भूमिका बजावत राहणार आहे. तो वरच्या स्थानावर खेळायला येईल, असे वाटत नाही, उलट आहे त्या स्थानावरच खेळायला येत राहील. धोनीच्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान आम्ही सर्वजण त्याला डावाची सुरुवात करायला हवी, असे म्हणत राहिलो, पण त्याने ऐकले नाही. कारकिर्दीच्या वेगळ्या वळणावर असताना त्याने आयपीएलचे नेतृत्वदेखील सोडले आहे. आता तो वरच्या स्थानावर येण्याची शक्यता नाहीच. संघाला गरज आहे, असे वाटत असेल तरच धोनी वरच्या स्थानावर फलंदाजी करू शकेल.’
धोनीची फटकेबाजी ही सकारात्मक बाब : फ्लेमिंगक्रिकेटचा खरा जाणकार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला की सर्वांत पहिले नाव डोळ्यापुढे येते ते महेंद्रसिंग धोनीचे. त्याने आयपीएल २०२४ मध्ये पहिल्यांदा फलंदाजी केली. आठव्या स्थानावर त्याने १६ चेंडूंत नाबाद ३७ धावा कुटल्या. या खेळीबद्दल चेन्नईचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, ‘धोनीच्या शानदार फटकेबाजीमुळे पराभवानंतरही संघाला सकारात्मक ऊर्जा लाभली. धावगतीसाठी लक्ष्यापर्यंत पोहोचणे किती आवश्यक आहे, हे धोनी जाणतो.’ दोन्ही डावांत पहिल्या सहा षटकांत आम्हाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आल्यामुळे पराभव पदरी पडला, असे फ्लेमिंग यांनी सांगितले.
भारताकडून २०१९ला अखेरचा सामना खेळणाऱ्या धोनीने मागच्या वर्षी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. क्लार्क पुढे म्हणाला, ‘तो चेंडू उत्कृष्टपणे हिट करीत असल्याने पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येईल, असे वाटत नाही. मी जितके फिनिशर पाहिले, त्यात धोनी सर्वोत्कृष्ट आहे. चेन्नई त्याच्या भूमिकेचा उपयोग पुढेही करीत राहील.’ माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या मते, धोनीला वरच्या स्थानावर पाठविण्याचा लाभ चेन्नई संघाला होईल. धोनी चेंडू दयामाया न दाखविता हिट करीत असल्याने त्याने वरच्या स्थानावर खेळायला येण्यास हरकत नाही. जडेजा धावांसाठी संघर्ष करीत असताना धोनी षट्कारांची आतषबाजी करीत होता, हे पाहून चाहत्यांच्या धोनीकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.